गांजा प्रकरणी अभाविप संघटनेसह आजी-माजी सिनेट सदस्य आक्रमक

आजी- माजी अधिसभा सदस्यांनी या प्रकरणी विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र दिले असून या घटनेची गंभीर दखल घेऊन विद्यापीठ प्रशासनाने ठोस उपाय योजना कराव्यात,अशी मागणी केली आहे. 

गांजा प्रकरणी अभाविप संघटनेसह आजी-माजी सिनेट सदस्य आक्रमक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University)गांजा सापडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अखील भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) निदर्शने करण्यात आली.तसेच या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.दरम्यान विद्यापीठाच्या आजी- माजी अधिसभा सदस्यांनी या प्रकरणी विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र दिले असून या घटनेची गंभीर दखल घेऊन विद्यापीठ प्रशासनाने ठोस उपाय योजना कराव्यात,अशी मागणी केली आहे. 

 विद्यापीठातील वसतीगृह क्रमांक आठ मध्ये एका विद्यार्थ्यांकडे गांजा सापडला होता.त्यावर विद्यापीठाकडून चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती.मात्र, त्यावर कारवाई करण्यास विलंब का झाला,अशी विचारणा करत विविध संघटनांनी आंदोलन केले.विद्यापीठ प्रशासन करत असलेल्या हलगर्जीपणामुळे विद्यापीठामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. या घटना थांबाव्यात म्हणून विद्यापीठाने उपाय योजना अद्याप केल्या नाहीत. याच्या निषेधार्थ  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आंदोलन करण्यात आले.पुणे हे विद्येच माहेरघर असून या शैक्षणिक प्रांगणामध्ये अशा अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई  होत नाही तोपर्यंत अभाविप या विरोधामध्ये काम करत राहील,असे संघटनेतर्फे कळवण्यात आले आहे.
-----------------------------

गांजा प्रकरणाने विद्यापीठाची बदनामी झाली आहे.त्यामुळे याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी.तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी अंमली पदार्थांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याबाबत संदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्या पत्रानुसार विद्यापीठाच्या वसतीगृह प्रमुखांनी विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.मुलींच्या व मुलांच्या वस्तीगृहासाठी स्वतंत्र वसतीगृहप्रमुख अर्थात रेक्टरची नियुक्ती करावी.यापुढील काळात अशा घटना समोर आल्या तर विद्यार्थी हिताचा विचार करून तीव्र आंदोलन केले जाईल. 
- संतोष ढोरे, माजी अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

------------------------
गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठातील वसतिगृहात अनुचित घटना घडत असून  विद्यापीठाची बदनामी होत आहे.त्यामुळे विद्यापीठात पूर्णवेळ वसतीगृह व्यवस्थापक अर्थात रेक्टरची नियुक्ती करावी. सध्या प्राध्यापकांना विद्यार्थ्यांकडे पुरेसे लक्ष देता येत नसल्याने अशा घटना घडत आहेत.त्याला पायबंद घालण्यासाठी विद्यापीठाने उपाय योजना करावी. 
- दादाभाऊ शिनलकर , अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ