कँटीन मधील वाईट जेवणाची मीडियाकडे तक्रार दिल्याने विद्यार्थ्यावर कारवाई; मुंबई विद्यापीठात अजब प्रकार

एमए इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी सिद्धांत शिंदे याने शिस्तीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप वसतिगृह वॉर्डन संतोष गीते यांनी केला आहे.

कँटीन मधील वाईट जेवणाची मीडियाकडे तक्रार दिल्याने विद्यार्थ्यावर कारवाई; मुंबई विद्यापीठात अजब प्रकार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

दूषित पिण्याच्या पाण्यामुळे वादात सापडलेल्या मुंबई विद्यापीठात (Mumbai University-MU) आता कँटीन मध्ये विद्यार्थ्यांना अस्वछ जेवण मिळत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील (University Kalina Campus) बॉईज हॉस्टेलच्या मेसमध्ये (Boys Hostel Mess) 'अस्वच्छ' जेवण दिल्याबद्दल मीडियाशी बोलल्याबद्दल एका विद्यार्थ्याला विद्यापीठाने शिस्तभंगाची नोटीस (Disciplinary notice to student)बजावली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या कृतीमुळे एमयूची प्रतिमा मलिन होत आहे.

एमए इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी सिद्धांत शिंदे याने शिस्तीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप वसतिगृह वॉर्डन संतोष गीते यांनी केला आहे.  सिद्धांतने वसतिगृहातील गैरप्रकारांबाबत वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध केल्याने विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत असल्याचा दावा गीते यांनी नोटीसमध्ये केला आहे. वॉर्डनच्या म्हणण्यानुसार, हे वसतिगृहाच्या शिस्तीच्या नियमांचे उल्लंघन आहे. विद्यार्थ्यांना मीडिया आणि पोलिस कर्मचाऱ्यांशी बोलण्यास प्रतिबंध आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारी थेट कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव किंवा पोलिसांकडे सादर करता येणार नाहीत. वसतिगृहाच्या वॉर्डन मार्फतच तक्रार नोंदवावी, असेही नियमांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात शिंदे यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.

 "एक नागरिक म्हणून मला प्रसारमाध्यमांशी बोलण्याचा अधिकार आहे. विद्यापीठाचे नियम घटनाबाह्य आहेत. शिवाय, कोणत्या प्राधिकरणाने हे नियम मंजूर केले आहेत, याचीही स्पष्टता नाही," असे सिध्दांत शिंदे म्हणाला. शिंदे याने वसतिगृहातील अन्न आणि औषध प्रशासन (FDA) तसेच BMC कडे हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर एफडीएच्या पथकाने काही दिवसांपूर्वी मेस सुविधेची पाहणी केली होती.

दरम्यान, महिन्याच्या सुरुवातीला, विद्यार्थ्यांनी जेवणाच्या गुणवत्तेच्या निषेधार्थ मेसवर 'बहिष्कार' टाकला होता.