चक्क स्मशानभूमीत अभ्यासिका, गावाचा सामुदायिक उपक्रम
एरवी केवळ अंत्यविधीचे ठिकाण म्हणून ओळख असलेली स्मशानभूमी सध्या आडाचीवाडी येथील गावकऱ्यांसाठी भेटीगाठीचे, तर मुलांसाठी अभ्यासाचे केंद्र बनली आहे. सामान्यतः भीती, शांतता आणि ओसाडपणा अशा प्रतिमांनी जोडली जाणारी स्मशानभूमी, आडाचीवाडीत मात्र आनंद, उत्साह, ज्ञानार्जनाचे प्रमुख केंद्र बनली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी (Adachiwadi in Purandar taluka) या गावाने एकदम आगळावेगळा सामुदायिक उपक्रम (Community Activities) राबवला आहे. शंभरपेक्षा कमी घरं असलेल्या या छोट्याशा वाडीने सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचं कारण म्हणजे गावाने अवघ्या काही दिवसांत विकासाची झेप ही कौतुकास्पद आहे. या गावात पायाभूत सुविधा, स्वच्छता, सामुदायिक उपक्रम या सर्वांसोबत गावची 'स्मशानभूमी' ही सर्वांचं लक्ष वेधून घेणारी (An attention-grabbing 'cemetery') ठरली आहे. येथील गावकऱ्यांनी अंधश्रद्धेला मुठमाती देत चक्क स्मशानभूमीत आधुनिक आणि सुसज्ज अशी अभ्यासिका उभारली (Study set up in the cemetery) आहे.
एरवी केवळ अंत्यविधीचे ठिकाण म्हणून ओळख असलेली स्मशानभूमी सध्या आडाचीवाडी येथील गावकऱ्यांसाठी भेटीगाठीचे, तर मुलांसाठी अभ्यासाचे केंद्र बनली आहे. सामान्यतः भीती, शांतता आणि ओसाडपणा अशा प्रतिमांनी जोडली जाणारी स्मशानभूमी, आडाचीवाडीत मात्र आनंद, उत्साह, ज्ञानार्जनाचे प्रमुख केंद्र बनली आहे.
हेही वाचा - कृषी विद्यापीठाती रिक्त पदे मार्च पर्यंत भरणार; कृषीमंत्र्यांची विधानसभेत माहिती
स्मशानभूमीत जाणे म्हणजे भीती नव्हे, शांतता मिळवणे असा अनेकांचा अनुभव होत आहे, असं येथील गावकरी सांगतात. गेल्या काही दिवसांपासून येथील मुले-मुली दररोज संध्याकाळी स्मशानभूमीत दोन तास अभ्यास करण्यासाठी एकत्र जमत आहेत. गटागटाने बसून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणारी मुलांची ही दृश्ये पाहून येणाऱ्या ग्रामस्थांनाही आनंद होत आहे. स्मशानभूमीत अभ्यास करताना आम्हाला भीती वाटत नाही. उलट शांत वातावरणामुळे अभ्यासावर चांगलं लक्ष केंद्रित करता येत, असं येथील मुलं सांगत आहेत.
स्मशानभूमीत स्वच्छ परिसर, आकर्षक फुलझाडे, बैठक व्यवस्था, प्रकाशयोजना, पाण्याची सोय यामुळे येथे सतत ग्रामस्थांची वर्दळ दिसते. दुपारचे जेवण उरकल्यावर गावातील अनेक ज्येष्ठ नागरीक फिरण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी येथे थांबतात. काहीजण स्मशानभूमीतील सावलीत विसावा घेतात आणि नंतर घरी जातात, असं येथील गावकरी सांगतात.
eduvarta@gmail.com