पीएचडी प्रवेशाची दुसरी फेरी सप्टेंबरनंतर?; रिक्त जागांच्या माहितीसाठी मुदतवाढ
विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने पीएचडी प्रवेशाच्या रिक्त जागांची माहिती सादर करण्यासाठी 14 ऑगस्ट पर्यंत मुदत दिली होती. परंतु, ही मुदत आता 23 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)विविध विभागांमधील आणि पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक (Pune, Ahilyanagar and Nashik) या जिल्ह्यांमधील मान्यता प्राप्त संशोधन केंद्रातील पीएचडी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीला (Second round of PhD admission)सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यास ऑक्टोबर महिना उजडणार आहे. विद्यापीठाने पीएचडी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात नुकतेच एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया आणखी काही दिवस लांबणार आहे.
विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रांमधील मार्गदर्शकांकडे (पीएचडी गाईड) उपलब्ध असलेल्या जागांची माहिती ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आली होती. त्यासाठी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने 14 ऑगस्ट पर्यंत मुदत दिली होती. परंतु, ही मुदत आता 23 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप ज्या संशोधन केंद्रांनी आणि मार्गदर्शकांनी आपल्याकडे रिक्त असलेल्या पीएचडीच्या जागांची माहिती सादर केली नाही,अशा प्राध्यापकांना येत्या 23 ऑगस्टपर्यंत ही माहिती सादर करता येणार आहे.
विद्यापीठाची संलग्न असणाऱ्या संशोधन केंद्रांनी दिलेल्या मुदतीत माहिती सादर करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास प्रशासकीय भवन पहिला मजला येथे आयटी संपर्क क्रमांक 020 71 53 36 33 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा phdtracking_support@pun.unipune.ac.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.