दोन वर्षासाठी विद्यापीठ नियुक्त करणार अधिष्ठाता; जाहिरात प्रसिद्ध

कुलगुरूंच्या निवृत्तीनंतर अधिष्ठाता पद संपुष्टात येते.त्यामुळे उर्वरित दोन ते अडीच वर्षांसाठीच पूर्णवेळ अधिष्ठाता म्हणून नियुक्ती मिळू शकणार आहे. परिणामी या अल्प कालावधीसाठी किती अर्ज येणार आणि त्यानंतर कोण नियुक्ती स्वीकारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दोन वर्षासाठी विद्यापीठ नियुक्त करणार अधिष्ठाता; जाहिरात प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)अधिष्ठाता (Dean)पदासाठी विद्यापीठातर्फे अर्ज मागविण्यात आले आहेत.मात्र, विद्यापीठ कायद्यानुसार अधिष्ठाता यांचे पद हे कुलगुरू यांचा कार्यकाल संपल्यानंतर तात्काळ संपुष्टात येते.त्यात सध्याचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी (Vice Chancellor Dr. Suresh Gosavi)यांचा सुमारे अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला असून अधिष्ठाता नियुक्तीसाठी सुमारे चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे उरलेल्या दोन वर्षासाठीच नव्या अधिष्ठात्यांना पूर्णवेळ काम करण्याची संधी मिळणार आहे.परिणामी या कालावधीसाठी किती उमेदवार अर्ज करतात. हे पहाणे उत्सुकतेचे होणार आहे.  

विद्यापीठाने या पूर्वी राबवलेली अधिष्ठाता पदाची भरती प्रक्रिया रद्द केली आहे. तसेच नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवले आहेत. त्यानुसार इच्छुक उमेदवार 13 नोव्हेंबर पासून १२ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. संबंधित पदासाठीची शैक्षणिक अहर्ता व इतर सर्व आवश्यक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे,असे विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव ज्योती भाकरे यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर स्पष्ट केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिष्ठाता पदी सध्या कार्यरत असलेले सर्व अधिष्ठाता हे प्रभारी म्हणून कामकाज पाहत आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या नियुक्तीनंतर नवीन अधिष्ठाता यांची नियुक्ती केली जाते. परंतु, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर डॉ.कारभारी काळे यांनी प्रभारी अधिष्ठाता यांची नियुक्ती केली. त्यानंतर पुन्हा सुरेश गोसावी यांनी सुध्दा प्रभारी अधिष्ठाता नियुक्त केले.त्यात काही विद्याशाखांच्या अधिष्ठातांची पदे ही बदलण्यात आली. परंतु, राज्य शासनाने नुकतीच अधिष्ठाता यांच्यासह कुलसचिव व इतर पदांची अहर्ता जाहीर केले आहे. त्यानुसार आता विद्यापीठातर्फे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. विद्यापीठात सुमारे दोन ते अडीच वर्षांपासून प्रभारी अधिष्ठाता कार्यरत आहेत. कुलगुरूंच्या निवृत्तीनंतर अधिष्ठाता पद संपुष्टात येते.त्यामुळे उर्वरित दोन ते अडीच वर्षांसाठीच पूर्णवेळ अधिष्ठाता म्हणून नियुक्ती मिळू शकणार आहे. परिणामी या अल्प कालावधीसाठी किती अर्ज येणार आणि त्यानंतर कोण नियुक्ती स्वीकारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सध्या विद्यापीठातर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असली तरी १२ डिसेंबर पर्यंत अर्ज स्वीकारल्यानंतर पुन्हा महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होणार आहे. त्यामुळे या कालावधीत नियुक्ती करणे अडचणीचे होणार आहे. परिणामी अधिष्ठाता नियुक्तीसाठी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.