सायबर सुरक्षेसोबत संगणक क्षेत्रातील नव्या आव्हानांना शिक्षकांनी तयार रहावे:  प्रा.सुभाष वारे

विविध ॲप हे कृत्रिम बुद्धिमत्तेत येतात.ते मानवी मेंदूला पर्याय ठरु शकत नाही .

सायबर सुरक्षेसोबत संगणक क्षेत्रातील नव्या आव्हानांना शिक्षकांनी तयार रहावे:  प्रा.सुभाष वारे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मोबाईलवर उपलब्ध होऊ घातलेले विविध ॲप हे कृत्रिम बुद्धिमत्तेत येतात.ते मानवी मेंदूला पर्याय ठरु शकत नाही . त्यावर भावी पिढीने स्वार व्हावे व या तंत्रज्ञानाचा सुनियोजित उपयोग करून घ्यावा. तसेच सायबर सुरक्षेसोबत संगणक क्षेत्रात  येऊ घातलेल्या नव्या आव्हानांना शिक्षकांनी तयार रहावे , असे आवाहन एस. एम. जोशी फाउंडेशनचे विश्वस्त प्रा. सुभाष वारे यांनी केले. 

राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाच्या वतीने नुकताच म. फुले स्मृतीदिन समाज शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात सुभाष वारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रशासक मंडळ सदस्य व शिक्षकेतर महासंघ कार्यवाह शिवाजी खांडेकर होते.यावेळी संस्थेच्या सचिव प्राचार्या वृंदा हजारे, सदस्य अलकाताई काळे,तुषार शिंदे, पर्यवेक्षक जीवन इंगळे , साने गुरुजी प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका मीना काटे उपस्थित होते.

शिवाजी खांडेकर म्हणाले, शिक्षकी पेशा इतर पेशा पेक्षा वेगळा असून भावी पिढी घडवणारा आहे. शिक्षण क्षेत्रात सध्या जी काही अनागोंदी चालली आहे त्याविरोधात उभे राहण्याची गरज आहे.  तसेच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगल्या निर्णयाचे स्वागत ही झाले पाहिजे. अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात आवाजही उठविला गेला पाहिजे. 

यावेळी संस्थेच्या वतीने बालवाडी ते बारावी पर्यंतच्या सर्व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. प्रशासक मंडळ सदस्य प्रा. भगवान कोकणे यांनी त्यांचे वडील कै लक्ष्मणराव कोकणे यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षक पुरस्कार सुरू केला. हा पुरस्कार रावसाहेब पटवर्धन विद्यालयाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक केशव बागल यांना प्रदान करण्यात आला. शिक्षकांच्या वतीने साने गुरुजी प्राथमिक शाळेचे शिक्षक सोपान बंदावणे यांनी मनोगत व्यक्त केले.