चंद्रपूर जिल्हा बँक भरती:रद्द झालेल्या परीक्षेची नवी तारीख जाहीर
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची २१ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली परीक्षा काही तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आली. त्यानंतर या परीक्षेचे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता ही परीक्षा २९ डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (Chandrapur District Central Bank Recruitment) २१ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली परीक्षा काही तांत्रिक कारणांमुळे रद्द (Examination cancelled) करण्याची नामुष्की बँक प्रशासनावर ओढावली. परीक्षा सुरू होऊन केवळ अर्धा तास उलटल्यावर परीक्षा रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर या परीक्षेचे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध (New schedule released) करण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता ही परीक्षा २९ डिसेंबर रोजी पार पडणार आहे.
दरम्यान, या परीक्षेसाठी उद्या बुधवार दि. २५ डिसेंबरपासून प्रवेशपत्रे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. उमेदवारांनी आपला नोंदणीकृत ईमेल तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २१ डिसेंबर आयोजित केलेल्या परीक्षेच्या दोन्ही शिफ्ट रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ही परीक्षा २९ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीद्वारे लिपिक पदासाठी २६१ आणि शिपाई पदासाठी ९७ अशा एकूण ३५८ जागांसाठी ही परीक्षा घेतली जात आहे. यासाठी राज्यातून ३१ हजार १५६ उमेदवारांनी यासाठी अर्ज केलेले आहेत. २१ डिसेंबर रोजी परीक्षार्थी पेपर सोडवण्यात मग्न असताना अचानक तांत्रिक गोंधळामुळे ही परीक्षाच रद्द करण्यात आली. अर्धा पेपर झाल्यानंतर अचानक पेपर पुढे ढकलल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घडलेल्या प्रकारामुळे परीक्षार्थींनी रोष व्यक्त केला आहे.
शनिवारी सकाळी १० वाजता परीक्षेला सुरुवात झाली मात्र परीक्षार्थ्यांनी प्रश्न सोडवून उत्तर 'सीलेक्ट' केल्यानंतर 'सेव्ह अॅण्ड नेक्स्ट करताना ते उत्तर आपोआपच 'चेंज' होत होते. ही बाब परीक्षकाला सांगितल्यानंतर दहा मिनिटांसाठी परीक्षा थांबविण्यात आली आणि काही वेळातच तांत्रिक अडचण असल्याचे कारण देत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यानुसार आता ही परीक्षा २९ डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.