धक्कादायक: बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून

एकाच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा खून केल्याचे समोर आले आहे. शहरातील गुन्हेगारी थांबताना दिसत नाही त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

धक्कादायक: बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सर्व पालकांसाठी चिंता निर्माण करणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यासारख्या (Pune) सांस्कृतिक जिल्ह्यातील बारामती (Baramati) शहरात असलेल्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील (Tuljaram Chaturchand College) बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याचा (student) कोयत्याने वार करून खून (Death) करण्यात आला आहे. खून करणारे दोघे आणि मृत पावलेला युवक  तिघेही बारावीचे विद्यार्थी आहेत. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.(crime news

विशेष म्हणजे एकाच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा खून केल्याचे समोर आले आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी (police) एका आरोपीला अटक केली असून दुसरा फरार आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने महाविद्यालयाचा परिसर ‘सील’ केला असून या  परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हल्ला झालेला विद्यार्थी मुळचा बाहेरील तालुक्यातील असून तो शिक्षणासाठी बारामती शहरात आल्याची  माहिती आहे.   

हा प्रकार नेमका कसा घडला?

या दोन विद्यार्थ्यांमध्ये एक महिन्यापूर्वी किरकोळ वाद झाला होता. हा वाद नेमका कशावरून झाला हे स्पष्ट झाले नसले तरी पार्किंगमध्ये गाडी लावण्यावरुन आणि दुचाकीला ‘कट’ मारण्याच्या वादातून झाला असल्याचा संशय आहे. आणि त्याचाच राग मनात ठेवून या विद्यार्थ्याने कोयत्याने हल्ला केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे आता उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतल्याचे सांगितले.

दरम्यान, या हल्ल्यात त्याच्यासोबत सहभागी असणारा दुसरा अल्पवयीन मुलगा फरार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. शहरातील गुन्हेगारी थांबताना दिसत नाही त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.