आरोग्य सेविकांच्या पदभरतीत घोळ? जिल्हा परिषदांनी पात्र ठरविले अपात्र

आरोग्य सेविका रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत दिसून येत आहेत. आरोग्य सेविकांच्या (एएनएम) ८ हजार ९५६ पदांसाठी शासनाने आयबीपीएस कंपनीमार्फत जुलैमध्ये परीक्षा घेतली. 

आरोग्य सेविकांच्या पदभरतीत घोळ? जिल्हा परिषदांनी पात्र ठरविले अपात्र

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आरोग्य सेविकांच्या पद भरतीत (Recruitment of Health Care Workers) झालेला घोळ आता चव्हाट्यावर आला आहे. त्याचे कारण म्हणजे राज्यातील विविध जिल्हा परिषदांकडून भरतीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना अपात्र (Eligible candidates will be disqualified) ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता आरोग्य सेविका रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत दिसून येत आहेत.

आरोग्य सेविकांच्या (एएनएम) ८ हजार ९५६ पदांसाठी (8 thousand 956 posts) शासनाने आयबीपीएस कंपनीमार्फत जुलैमध्ये परीक्षा घेतली. परंतु, परीक्षेच्या जाहिरातीत ‘आरोग्य सेविका’ या शब्दासोबतच ‘आरोग्य परिचारिका’ असाही शब्दप्रयोग करण्यात आला. त्यामुळे उच्च शैक्षणिक अर्हता (जीएनएम व बीएस्सी नर्सिंग) असलेल्या उमेदवारांनीही परीक्षाही दिली. त्यांना छाननी दरम्यान पात्र ठरवण्यात आले. परंतु, निकाल लागल्यानंतर या उमेदवारांना आरोग्य सेविका पदासाठी जिल्हा परिषदांनी अपात्र ठरविले आहे. त्यामुळे पात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये रोष दिसून येत असून ते आंदोलनाच्या तयारीत आहेत. 

अनेक वर्षापासून रेंगाळलेली जिल्हा परिषद आरोग्य सेविकांची पदभरती परीक्षा कशीबशी राबवण्यात आली. मात्र, ९ हजार पदांसाठी झालेल्या परीक्षेत ५५ हजार उमेदवार सहभागी झाले अन् त्यातून फक्त सहाच हजार उत्तीर्ण झाले. त्यातूनही उच्च शैक्षणिक पात्रताधारक असल्याचे सांगून अनेकांना अपात्र ठरविण्यात आहे.त्यामुळे परीक्षेनंतरही आरोग्य सेविकांची जवळपास चार हजार पदे रिक्तच राहणार आहेत. 

यवतमाळ जिल्हा परिषदेअंतर्गत ३१५ पदांसाठी परीक्षा झाली. यात १०३ उमेदवार पास झाल्यावर त्यातील ३६ महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे. अकोल्यात १२२ पदांसाठी परीक्षा झाली. यात ६७ महिला पास झाल्यावर त्यातील २२ महिलांना अपात्र ठरविण्यात आले. नंदुरबारमध्ये २८४ पदांसाठी परीक्षा झाली. यात २१ उमेदवार उत्तीर्ण झाल्या. मात्र, सहा जणींना अपात्र करून १५ जणींनाच पात्र ठरविले आहे. अशाच प्रकारे सर्व जिल्ह्यांमध्ये परीक्षेनंतर अनेक पात्र उमेदवारांना उच्च शैक्षणिक अहर्ता असल्याचे कारण दाखवत अपात्र ठरविण्यात आले आहे.