एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
एका दलित, अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आलेला तो, गरीबी पाचवीला पुजलेली पण अभ्यासात हुशार. आपल्या हुशारीने आणि चिकाटीने तो पहिल्याच प्रयत्नात JEE उत्तीर्ण झाला पण IIT मध्ये शुल्क जमा करण्यासाठी त्याला 17 हजार 500 रुपयांची तजवीज करायला फक्त 3 मिनिटांचा उशीर झाला म्हणून त्या दलित युवकाचा प्रवेश रद्द करण्यात आला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थी करत संबंधित युवकाला IIT धनाबाद मध्ये प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत.
अतुल कुमार या उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका गावातील 18 वर्षीय दलित विद्यार्थ्याला (Dalit youth) शुल्क भरण्यास फक्त 3 मिनिटे उशीर झाला म्हणून IIT धनाबादने (IIT Dhanabad) प्रवेश नाकारला होता. या विरोधात अतुल कुमारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अतुलच्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांनी IIT धनाबादला विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्याला बीटेक प्रोग्राममध्ये प्रवेश देण्यास सांगितले आहे.
CJI D.Y. चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, “याचिकाकर्त्यांसारखा हुशार विद्यार्थी उपेक्षित गटातील आहे. त्याने प्रवेश मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत, त्याला प्रवेशापासून वंचित ठेवता कामा नये. आम्ही निर्देश देतो की, विद्यार्थ्याला आयआयटी-धनबादमध्ये प्रवेश द्यावा आणि त्याला त्याच बॅचमध्ये राहण्याची परवानगी द्यावी ज्यामध्ये त्याने फी भरली असती तर त्याला प्रवेश मिळाला असता.”
न्यायालय म्हणाले, “आम्ही अशा तरुण हुशार मुलाला जाऊ देऊ शकत नाही. तो आधी झारखंड विधी सेवा प्राधिकरणाकडे गेला. त्यानंतर तो चेन्नई विधी सेवा प्राधिकरणाकडे गेला आणि त्यानंतर त्याला उच्च न्यायालयात पाठवण्यात आले. तो एक दलित मुलगा आहे त्याला असे दारोदार भटकावे लागते. ही खेदाची बाब आहे.” न्यायालयाने अतुल कुमार याला उज्वल भविष्याच्या शुभेच्छाही दिल्या.