विद्यापीठाच्या 111 जागांसाठी तब्बल 10 हजार उमेदवारांची नोंदणी ; ऑनलाइन अर्जासाठी उरले शेवटचे तीन दिवस 

मंगळवारी (दि.१३) सायंकाळी 6 वाजेपर्यंत 9 हजार 816 उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यातील साडेपाच हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

विद्यापीठाच्या 111 जागांसाठी तब्बल 10 हजार उमेदवारांची नोंदणी ; ऑनलाइन अर्जासाठी उरले शेवटचे तीन दिवस 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील(Savitribai Phule Pune University)विविध विभागांमध्ये प्राध्यापक पदाच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया (Faculty recruitment process) सुरू असून विद्यापीठातर्फे 111 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. मंगळवारी (दि.१३) सायंकाळी 6 वाजेपर्यंत 9 हजार 816 उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यातील साडेपाच हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ऑनलाइन अर्जासाठी शेवटचे तीन दिवस उरले आहेत.मात्र, अर्ज भरलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता विद्यापीठातील प्राध्यापक भरतीमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. (Recruitment of 111 Vacancies of Professors)

विद्यापीठातील विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविले जात आहेत. आतापर्यंत सुमारे दहा हजार उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यातील 5 हजार 558 उमेदवारांनी अर्ज पूर्ण भरला असून 5 हजार 103 उमेदवारांनी अर्जासह शुल्कही भरले आहे. विद्यापीठातर्फे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 16 फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे तर अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्यास 29 फेब्रुवारी पर्यंत मुदत आहे. त्यामुळे पुढे दोन-तीन अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते,असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा: शिक्षण शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम नोंदवण्याचा आज शेवटचा दिवस ?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रिया रखडली होती. राज्य शासनाने 2088 जागांवर भरती करण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार विविध महाविद्यालयांमधील रिक्त पदांवर प्राध्यापक भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. आता विद्यापीठातील विविध विभागांमधील रिक्त जागांवरील भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.तसेच बहुतांश विद्यापीठांनी भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे. केवळ राज्यातच नाही तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नामांकित विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या विद्यापीठात काम करण्याची संधी मिळावी यासाठी हजारो उमेदवार प्रयत्न करत आहेत.