विद्यार्थी अडवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा ; काय आहे कारण
स्वाधार योजनेचा अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा नसल्याने समाज कल्याण कार्यालयात वारंवार जावे लागते. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे स्वाधारसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून द्यावी.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर dr.babasaheb ambedkar यांच्या नावाने सुरू झालेल्या स्वाधार योजनेसाठी swadhar yojana राज्य शासनाकडे निधी उपलब्ध नाही. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून अनेक विद्यार्थी योजनेची थकीत रक्कम केव्हा मिळेल यांच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच स्वाधार योजनेचा अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा नसल्याने समाज कल्याण कार्यालयात वारंवार जावे लागते. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे स्वाधारसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. यासह इतर प्रलंबित मागण्यासाठी सुमारे दहा दिवसांपासून समाज कल्याण कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता राज्यभर बेमुदत उपोषण करण्याचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे chief minister eknath shinde यांचा ताफा अडविण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणाचा, राहण्याचा, जेवणाचा खर्च भागवता यावा या उद्देशाने २०१६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीसाठी समाज कल्याण विभागाकडून आवश्यक कार्यवाही केली जात नाही, असा आरोप स्वाधार योजना विद्यार्थी हक्क समितीतर्फे बुधवारी पत्रकार परिषदेत करण्यात आला. यावेळी समितीचे पदाधिकारी सुमित थोरात , राजरतन बलखंडे ,अनिकेत बनसोडे, महेश बळवंत, स्नेहल गिरमकर अस्मिता बेडलवार आदी उपस्थित होते.
सुमित थोरात म्हणाले, वेळोवेळी पाठपुरावा करूनही स्वाधार योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात नाहीत. तसेच अर्जातील त्रुटी दुरुस्तीसाठी वारंवार समाज कल्याण कार्यालयात जावे लागते. कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे कामे जलद गतीने होत नाहीत. अनेक विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून योजनेची रक्कम मिळाली नाही. शिक्षण सुरू असताना योजनेचा लाभ मिळाला नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही.
स्वाधार योजना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू आहे. या योजनेसाठी शासनाकडून आवश्यक निधीची तरतूद केली जात नाही. ही खेदाची बाब आहे. मात्र, त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत योजनेचा लाभ मिळत नाही. राज्य शासनाने आतापर्यंत केवळ खोटी आश्वासने दिली आहेत. त्यामुळे यापुढील काळात मागण्या मान्य झाल्या नाही तर राज्यातील सर्व जिल्ह्यात बेमुदत उपोषण करण्याचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्याचा निर्णय समितीतर्फे घेण्यात आला आहे.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व विद्यार्थी यांनी स्वाधार योजनेबाबतच्या अडचणी सांगितल्या. तसेच शासनाने लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी केली.