पाचवी,आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन २ म्हणजेच वार्षिक परीक्षा; शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

येत्या २, ३ व ४ एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये राज्यातील शाळांमध्ये एकाच वेळी संकलित मूल्यमापन २ चे आयोजन करण्यात येणार आहे.

पाचवी,आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन २ म्हणजेच वार्षिक परीक्षा; शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शालेय शिक्षण विभागातर्फे (Department of School Education)नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षात राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये आयोजित केली जात आहे. इयत्ता ३ री ते ८ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (एकूण १० माध्यम) करिता तीन नियतकालिक मूल्यांकन (PAT) चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यापैकी आतापर्यंत पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन १ चे (Base Test and Summative Assessment 1)आयोजन करण्यात आले असून येत्या २ ३ व ४ एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये राज्यातील शाळांमध्ये एकाच वेळी संकलित मूल्यमापन २ चे (Summative Assessment 2)आयोजन करण्यात येणार आहे,तसेच तसेच इयत्ता ५ वी आणि ८ वी साठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन योजनेतील संकलित मूल्यमापन २ म्हणजेच वार्षिक परीक्षा असणार आहे. या परीक्षेकरिता प्रत्येक शाळांनी शाळास्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा घ्यावी, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालिका डॉ.कामलादेवी आवटे (Deputy Director of State Educational Research and Training Council Dr. Kamaladevi Awte)यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. 

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून इयत्ता ५ वी आणि ८ वी साठी वार्षिक परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शाळांच्या इयत्ता ५ वी आणि ८ वी साठी एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा घेण्यात यावी,असे निर्देश आहेत.हा शासन निर्णय हा सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांसाठी लागू करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार इयत्ता ५ वी व ८ वी वार्षिक परीक्षा ही द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहे. या वार्षिक परीक्षांसाठी इयत्ता ५ वी ला प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, व परिसर अभ्यास हे विषय असतील तर इयत्ता ८ वी ला प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्र हे विषय असतील. 

हेही वाचा : शिक्षण आरटीईच्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढू नका ; प्राथमिक संचालकांचे स्पष्ट निर्देश

इयत्ता ३ री, ४ थी, ६ वी, ७ वी करिता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या तीन विषयांकरिता नियतकालीक मुल्यांकन चाचणी हीच संकलित मूल्यमापन २ असेल.  त्यामुळे या विषयांसाठी स्वतंत्रपणे संकलित मूल्यमापन -२ घेण्यात येणार नाही. तसेच उर्वरित विषयांचे संकलित मूल्यमापन २ शाळांनी त्यांच्या स्तरावर प्रश्नपत्रिका विकसित
करून घ्यावयाचे आहे.इयत्ता ५ वी व ८ वी साठी मात्र नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) ही संकलित मूल्यमापन २ असणार नाही. या दोन इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा ही स्वतंत्रपणे घेण्यात येईल. त्यामुळे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांनी दिनांक २ ३ व ४ एप्रिल २०२४ या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे आयोजन निश्चित केले असल्यामुळे सदर चाचणीनंतरच शाळांनी  वार्षिक परीक्षेचे आयोजन करावे,असे प्रशिक्षण परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

 शाळांनी प्रश्नपत्रिका विकसन करताना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी त्यांच्या maa.ac.in या संकेतस्थळावर इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेसाठी नमुना प्रश्नपत्रिका तसेच संविधान तक्ते उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा उपयोग करून प्रश्नपत्रिका तयार कराव्यात. 
इयत्ता पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थी ज्या विषयात उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत.  शाळेमार्फत त्या विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करून वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्याच्या आत पुनर्परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल. पुनर्परीक्षाचे आयोजन देखील उपरोल्लेखित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित शाळांनी करावयाचे आहे. पुनर्परीक्षा घेताना शाळांनी कोणती दक्षता घ्यावयाची याबाबतचे निर्देश संबधित शासन निर्णयात दिलेले आहेत.