'यूजीसी'ने कात टाकली; विद्यार्थी, प्राध्यापकांना एका क्लिकवर मिळणार महत्वाची माहिती

आयोगाच्या नवीन संकेतस्थळावर विद्यार्थी, प्राध्यापक, महाविद्यालये, विद्यापीठे अशा प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र स्थान देण्यात आले आहे.

'यूजीसी'ने कात टाकली; विद्यार्थी, प्राध्यापकांना एका क्लिकवर मिळणार महत्वाची माहिती
UGC New Website

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) एकाचवेळी तीन नवीन संकेस्थळांचे (Website) अनावरण करत विद्यार्थी (Students), प्राध्यापक (Professors) व शैक्षणिक संस्थांना (Educationl Institutes) दिलासा दिला आहे. आयोगाच्या संकेतस्थळामध्ये अनेक बदल करून हे नवीन संकेतस्थळ मंगळवारी सुरू करण्यात आले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रगतीचा आढावा घेणारे उत्साह (UTSAH) हे पोर्टल अनावरणही मंगळवारी करण्यात आले आहे.

आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार (Jagdish Kumar) यांनी या दोन्ही पोर्टलचे अनावरण केले. आयोगाच्या नवीन संकेतस्थळावर विद्यार्थी, प्राध्यापक, महाविद्यालये, विद्यापीठे अशा प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक घटकाला आपल्या आवश्यकतेनुसार माहिती मिळवणे सहज सोपे होणार आहे. त्याचप्रमाणे विशिष्ट माहितीच हवी असल्यास फिल्टर हा पर्यायही देण्यात आला आहे. याद्वारे काही विशिष्ट शब्द (KeyWords) वापरून ही माहिती शोधणे शक्य होणार आहे.

हेही वाचा : निकालास विलंब झाल्यास कुलगुरुंना जबाबदार धरणार : राज्यपाल रमेश बैस

संकेतस्थळावर सर्व विद्यापीठे, महाविद्यालये व संलग्न शैक्षणिक संस्थांची नावेही उपलब्ध असतील. विविध विभागांची माहितीही देण्यात आली असून त्याआधारे सर्वच घटकांना ई-मेल किंवा दुरध्वनीच्या माध्यमातून थेट संपर्क साधता येणार आहे. आयोगाचे विविध उपक्रम, नियम, अटी, परिपत्रके, नोटीस, विद्यापीठांची माहिती, डॅशबोर्ड, ई-गव्हर्नन्स आदी माहितीही संकेतस्थळावर राहणार आहे.

शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी 'उत्साह'

अंडरटेकिंग इन्फॉम्रेटिव्ह ट्रान्सफॉर्मेटिव्ह स्ट्रटेजीज अन्ड अक्शन इन हायर एज्युकेशन म्हणजेच उत्साह. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या प्रामुख्याने दहा महत्वाच्या घटकांवर आधारीत प्रगतीचा आढावा, त्यासाठी केलेले प्रयत्नांची माहिती उत्साह या पोर्टलवर विद्यापीठांना भरता येणार आहे. त्यामध्ये विद्यार्थी केंद्रीत शिक्षण, डिजिटल शिक्षण, उद्योग व शैक्षणिक संस्थांमधील भागिदारी, शैक्षणिक संशोधन, आंतरराष्ट्रीयीकरण आदी बाबींचा समावेश आहे. उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी यूजीसीकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहितीही या पोर्टलवर मिळणार आहे.  

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2