प्राध्यापक भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची मुदत संपली; तब्बल 6 हजार उमेदवारांचे अर्ज

रात्री बारा वाजेपर्यंत ही संख्या सहा हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्राध्यापक भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची मुदत संपली; तब्बल 6 हजार उमेदवारांचे अर्ज

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University)प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी (Recruitment process) ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात असून 16 फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत (Online application deadline) संपणार आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत 5 हजार 890 उमेदवारांनी शुल्कासह अर्ज भरला असल्याची माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी दिली. रात्री बारा वाजेपर्यंत ही संख्या सहा हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मात्र,एकाच उमेदवाराने दोन वेळा अर्ज भरल्यामुळे पात्र उमेदवारांची संख्या कमी होऊ शकते. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये 111 पदांसाठी 1 जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. आतापर्यंत 10  हजार 174 उमेदवारांनी नोंदणी केली असली तरी त्यातील शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत 6 हजार 329 उमेदवारांनी पूर्ण अर्ज भरला होता. मात्र यातील 5 हजार 890 उमेदवारांनी शुल्कासह अर्ज सबमिट केला होता. काही उमेदवारांनी अर्जात चुका झाल्यामुळे दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा अर्ज भरला आहे. त्यामुळे आत्ताच अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची संख्या निश्चितपणे सांगता येणार नाही.

विद्यापीठाकडून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आता मुदतवाढ दिली जाणार नाही. मात्र,  ज्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरला आहे, अशा उमेदवारांच्या अर्जाची हार्ड कॉपी येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत स्वीकारली जाणार आहे. विद्यापीठाकडे जमा केलेल्या अर्जामधूनच भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची निश्चिती केली जाणार आहे. त्यामुळे प्राप्त होणाऱ्या अर्जांची छाननी करून पात्र व अपात्र अर्ज वेगळे काढण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे,असेही विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.