सर्व विद्यापीठे परीक्षा व निकालांसाठी हितसंबंधित कंत्राटी सॉफ्टवेअर कंपनीवर अवलंबून!
अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाची प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक बारामती शहरात संपन्न झाली. या बैठकीत शैक्षणिक व सामाजिक विषयातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांना घेऊन प्रस्ताव पारित करण्यात आले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे (Universities in Maharashtra) परीक्षा व निकालांसाठी खाजगी किंबहुना हितसंबंधित अशा कंत्राटी सॉफ्टवेअर कंपनीवर अवलंबून आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यापीठासाठी अद्ययावत अशी परीक्षा (Examination) व निकाल (Result) प्रणाली सुलभ करणारे सॉफ्टवेअर स्वतः विद्यापीठाने तयार करावे, असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) केले आहे.
'अभाविप' पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाची प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक बारामती शहरात संपन्न झाली. या बैठकीत शैक्षणिक व सामाजिक विषयातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांना घेऊन प्रस्ताव पारित करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व अकृषी व तंत्रज्ञान विद्यापीठांमध्ये परीक्षा व निकाल या विषयात प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अनियमितता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास येत आहे. जर सर्व विद्यापीठात अशीच परिस्थिती राहिली आणि विद्यापीठाने ठोस पाऊले उचलली नाहीत तर शैक्षणिक गुणवत्ता व शिक्षण व्यवस्थेचा दर्जा खालावेल, अशी चिंता बैठकीत व्यक्त करण्यात आली.
विद्यापीठाला निकालाची घाई; वेळेत केला बदल अन् प्राध्यापक झाले सैरभैर
राज्यामध्ये सर्वत्र प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या घटना निदर्शनास येत आहेत. अशा घटनांना आळा घालून कायदेशीर मार्गाने व भ्रष्टाचार मुक्त प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवण्याचे आवाहनही प्रदेश कार्यकारिणीमध्ये करण्यात आले. शिष्यवृत्ती अर्ज करण्याची प्रक्रिया ही वेळखाऊ असल्या कारणाने पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्यास विलंब होतो. त्यामुळे शिष्यवृत्ती अर्ज हे प्रवेश प्रक्रिये सोबतच भरून घेण्यात यावेत, असे बैठकीत सुचविण्यात आले.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात एका विद्यार्थिनीवर कोयत्याने खुनी हल्ला करण्यात आला. तसेच नुकतीच प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या एका विद्यार्थिनीची निर्घृणपणे हत्या केली. यामागे सध्याच्या युवकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे वाढते प्रमाण कारणीभूत आहे. अशा प्रकारच्या प्रवृत्तीवर चाप बसवण्यासाठी गृह मंत्रालय विभाग व पोलीस प्रशासनाने कठोर पाऊले उचलावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे म्हणाले की, अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाच्या या प्रदेश कार्यकारिणी बैठकीला उपस्थित सर्व प्रतिनिधी कार्यकर्त्यांच्या संमतीने हे दोन्ही प्रस्ताव पारित करण्यात आले आहेत. बैठकीनंतर च्या पुढील आगामी काळात या मुद्द्यांना प्रामुख्याने लक्षात ठेवून अभाविप कार्यकर्ते आपल्या क्षेत्रात कार्य करतील.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD
eduvarta@gmail.com