..तर प्राध्यापक संघटना परीक्षांवर बहिष्कार घालणार; MFUCTO चा इशारा
मान्यता मान्य न झाल्यास नाईलाजास्तव परीक्षेच्या कामावर बहिष्कार व बेमुदत काम बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,असा इशारा एम.फुक्टो संघटनेचे अध्यक्ष प्रा.एस.पी.लवांडे यांनी शुक्रवारी दिला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
MFUCTO NEWS: " राज्यातील महाविद्यालयात 100 टक्के प्राध्यापक भरती (Professor Recruitment)झालीच पाहिजे. प्राध्यापक नसतील तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (National Education Policy)प्रभावी अंमलबजावणी करता येणार नाही.त्याचप्रमाणे महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा (Professors on hourly basis- CHB)प्रश्न गंभीर असून त्यावर त्यांना सहाय्यक प्राध्यापक पदाचे वेतन द्यायला हवे'. प्राध्यापक संघटनेच्या अशा अनेक प्रलंबित मागण्या असून या मान्यता मान्य न झाल्यास नाईलाजास्तव परीक्षेच्या कामावर बहिष्कार व बेमुदत काम बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,असा इशारा एम.फुक्टो (MFUCTO)संघटनेचे अध्यक्ष प्रा.एस.पी.लवांडे (S.P.Lawande)यांनी शुक्रवारी दिला. त्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी (Savitribai Phule Pune University Vice Chancellor Dr. Suresh Gosavi)यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासनाकडे पत्रव्यवहार करून व चर्चा करून प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघातर्फे (एम.फक्टो) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटना व नेट सेट पात्रताधारक संघटनेने शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मोर्चा काढला. यावेळी एम.फक्टोचे अध्यक्ष प्रा.एस.पी.लवांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ.के.एल.गिरमकर यांच्यासह पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील प्राध्यापक मोठ्या संघटनेने उपस्थित होते. मोर्चाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर,प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, व्यवस्थापन परिषद सदस्य रविद्र शिंगणापूरकर, डॉ.देविदास वायदंडे,सागर वैद्य आदींनी भेट देऊन प्राध्यापकांशी संवाद साधला.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे रेग्युलेशन्स देशाच्या संविधानानुसार विद्यापीठावर बंधनकारक असतानाही महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या दबावाखाली कुलगुरूंनी ११ मार्च २०११ रोजी काढलेले आदेश हे भारतीय संविधानाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात आहेत.याची जाणीव कुलगुरू यांना करून देण्यात आली होती.परंतु, आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.त्याचप्रमाणे युजीसी रेग्युलेशन व कायद्याचा वापर घरगुती पद्धतीने हवा तसा केला जातो. त्याचाही यावेळी निषेध करण्यात आला.
विद्यापीठांच्या कुलगुरूंनी आपापल्या पदव्युत्तर विधी विभागाच्या तज्ञांशी चर्चा करून घटनेच्या विरोधातील वर्तन दुरुस्त करावे, अशी विनंती एम.फुक्टोतर्फे करण्यात आली.याबाबत राज्य सरकारला कायदेशीर बाबी लक्षात आणून द्याव्यात अशीही विनंती केली. या बाबी मान्य न झाल्यास महाराष्ट्रातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षक विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या कामाशी संपूर्णपणे असहकार पुकारणार आहे, याचीही जाणीव मोर्चाच्या माध्यमातून करून देण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोग रेग्युलेशन नुसार विद्यापीठ व सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये १०% नियमित पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी बाबतच्या अडचणी सोडवणेसाठी विद्यापीठाने खंबीर भूमिका बजवावी. विद्यापीठ अनुदान आयोग संशोधनासंबंधीच्या रेग्युलेशनची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्यात यावी.तसेच प्राध्यापक प्रमोशन दिरंगाई रोखण्यात यावी,आदी मागण्या मोर्चा दरम्यान करण्यात आल्या.
----------------------------
प्राध्यापकांच्या मागण्या रास्त आहेत. युजीसीच्या नियमावलीनुसार 90 टक्के प्राध्यापक भरतीबाबत पाठपुरावा करावा, यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला जाईल. एनईपीची अंमलबजावणीसाठी विद्यार्थी केंद्रीत व प्राध्यापकांना बरोबर घेऊन खंबीरपणे भूमिका घेतली जाईल. संशोधन प्रक्रियेत निर्माण झाल्या अडचणीबाबत पुढील दोन ते तीन दिवसात चर्चा करून मार्ग काढला जाईल. मी सुध्दा प्राध्यापक आहे, त्यामुळे मला प्राध्यापकांचे दुख: माहीत आहे.मात्र, यापुढे विद्या दानाचे काम करण्यासाठी आपण एकत्र येऊ यात,असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले.
eduvarta@gmail.com