MPSC च्या १८ आणि २५ ऑगस्टच्या परीक्षा पुढे ढकलण्यावर आयोग काय म्हणाले..
आयबीपीएस ला यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात असून यावर काय तोडगा काढता येतो, यावर विचार सुरू आहे. विद्यार्थ्यांचे हित यालाच आमचे प्रथम प्राधान्य आहे, असे एमपीएससीच्या सचिव डाॅ. सुवर्णा खरात म्हणाल्या.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात येणारी समाजकल्याण विभागाची परीक्षा व आयबीपीएस आरआरबीआय परीक्षा (IBPS RRBI Exam) आणि राज्यसेवा व आयबीपीएस लिपीक बँक ही परीक्षा एकाच दिवशी (State service and IBPS exam on same day) होणार असल्याने दोन्ही परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. यावर एमपीएससीच्या सचिव डाॅ. सुवर्णा खरात (MPSC Secretary Dr. Suvarna Kharat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, आयबीपीएसला यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात असून यावर काय तोडगा काढता येतो, यावर विचार सुरू आहे. विद्यार्थ्यांचे हित यालाच आमचे प्रथम प्राधान्य आहे.
‘आयबीपीएस’च्या तारखांची घोषणा जानेवारी २०२४ मध्ये झाली असतानाही ‘एमपीएससी’ने तारखांचा घोळ केल्याची ओरड होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ही परीक्षा आधीच दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. त्याच दिवशी बँकिंगमधील आयबीपीएस लिपीक परीक्षा होणार आहे. तर दुसरीकडे १८ ऑगस्ट रोजी ‘एमपीएससी’कडून समाजकल्याण विभागाच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही जाहिरात गेल्या वर्षीची असून परीक्षेची तारीख गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. पण त्याच दिवशी आयबपीएस आरबीआय परीक्षाही नियोजित आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी हे दोन्ही परीक्षांसाठी अर्ज करतात. असे असताना दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने विद्यार्थ्यांना कुठल्याही एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, २५ ऑगस्टला कर्नाटक राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा नियोजित होती. मात्र, त्यांनी याच दिवशी आयबीपीएस लिपीक परीक्षा असल्याने ही परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले. त्यामुळे ‘एपीएससी’नेही परीक्षांच्या तारखा पुढे ढकलाव्या अशी मागणी होत आहे.
मराठा आरक्षणावरून ‘एमपीएससी’ने राज्यसेवा पूर्व परीक्षा आधीच दोनदा पुढे ढकलली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. काही राजकीय पुढाकाऱ्यांकडूनही समाज माध्यमांवर तशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे ‘आयबीपीएस’मध्ये मोजकेच परीक्षार्थी असल्याने राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलू नका अशी मागणी ‘एमपीएससी’ची तयारी करणारे विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे परीक्षेसंदर्भात दोन मतप्रवाह आहेत.
eduvarta@gmail.com