नीट परीक्षेच्या वादात आदित्य ठाकरे यांची उडी; सरकारने लक्ष देण्याची केली मागणी

देशभरात स्पर्धा परिक्षांमध्ये सुरु असलेले घोळ दिवसेंदिवस वाढतच चाललेत. पेपरफुटीच्या घटना सातत्याने घडत आहेत. NEET च्या निकालांमधला नवीन घोळ समोर आलाच आहे. आत्तापर्यंत अनेक तरुण विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांच्या तणावाला बळी पडून आत्महत्या केल्या आहेत. हे भयंकर आहे.

नीट परीक्षेच्या वादात आदित्य ठाकरे यांची उडी; सरकारने लक्ष देण्याची केली मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सध्या देशभर नीट परीक्षेवरून (NEET Exam) रणकंदन पेटले असताना राज्याचे माजी मंत्री व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पेपरफुटीवर भाष्य केले आहे. देशभरात स्पर्धा परिक्षांमध्ये सुरु असलेले घोळ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.पेपरफुटीच्या (paper break) घटना सातत्याने घडत आहेत. त्यातच NEET परीक्षेच्या च्या निकालांमधला नवीन घोळ समोर आला आहे. आत्तापर्यंत अनेक तरुण विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांच्या तणावाला बळी पडून आत्महत्या केल्या असून  हे भयंकर आहे. त्यामुळे सातत्याने घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटना थांबवण्यासाठी नव्या सरकारने याकडे लक्ष द्यावे,अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी x या सोशल मीडियावरून पोस्ट टाकत केली आहे.

देशासमोर उभा असलेला बेरोजगारीचा गंभीर प्रश्न आणि परिक्षांमधला भ्रष्टाचार ह्याचा फटका सामान्य घरातल्या मेहनती मुलांना बसतोय. भविष्य घडवण्यासाठी ही मुलं जीवापाड मेहनत करत असतात, अभ्यास करत असतात, पण अनेकदा त्यांच्या नशीबी निराशाच येते. ना नोकऱ्या मिळतात, ना उच्च शिक्षणाच्या संधी, अशी पोस्ट त्यांनी 'एक्स' या आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. 

हे चित्र तातडीने बदलायला हवं. सगळ्यात तरुण देश असलेल्या आपल्या भारतातल्या तरुणांना न्याय मिळायला हवा! केंद्रात येऊ घातलेल्या नव्या सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावं, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. 

काही दिवसांपु्र्वी देशातील हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या ‘नीट’ (NEET) या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकालही जाहीर झाला. मात्र, हा निकाल जाहीर होताच देशभरात वाद निर्माण झाला आहे. तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळणे ही बाब अशक्यप्राय वाटते. याहून अशक्य गोष्ट म्हणजे काही विद्यार्थ्यांना ७१८ अथवा ७१९ असे गुण मिळाले आहेत. मात्र, नीट परीक्षेतील गुणांची योजना पाहता अशा प्रकारचे गुण मिळणे हे निव्वळ अशक्य आहे. या गुणांमध्ये दिसत असलेली तफावत पाहता विद्यार्थी आणि पालकांकडून परीक्षा घेणाऱ्या ‘एनटीए’वर शंका उपस्थित केली जात आहे. त्यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.