पाचवी,आठवी स्कॉलरशीप परीक्षा अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात; येत्या 8 फेब्रुवारीला परीक्षा
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा आणि शिक्षकांची सीटीईटी परीक्षा एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (Maharashtra State Examination Council)माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक (Schedule for 5th and 8th scholarship exams)जाहीर झाले आहे. परीक्षा अर्ज 27 ऑक्टोबरपासून भरता येणार आहेत. विद्यार्थी येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरू शकणार आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना एकूण 200 रुपये परीक्षा शुल्क असून मागासवर्गीय व दिव्यांग संवर्गातील विद्यार्थ्यांना 125 रुपये शुल्क आहे. हे शुल्क 30 नोव्हेंबरपर्यंत आकारले जाणार आहे.त्यानंतर विलंब शुल्क व अति विलंब शुल्क यासाठी वेगळे नियम लागू आहेत. पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा बरोबरच 8 फेब्रुवारी रोजी विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा तसेच आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे, राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी याबाबतचे वेळापत्रक व प्रसिध्दी पत्रक प्रसिद्ध केले आहे.
दरम्यान, राज्यातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शिक्षक टीईटी परीक्षेची तयारी करत आहेत. त्यातच सीटीईटी ही परीक्षा येत्या 8 फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा आणि शिक्षकांची सीटीईटी परीक्षा एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
eduvarta@gmail.com