प्राध्यापक भरतीसाठी पुन्हा आंदोलन सुरू; भरतीसाठी उमेदवार आक्रमक

राज्यभरातील विविध विभागांमधील पात्रता धारक उमेदवार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. ना जात,ना धर्म,ना पक्ष.. प्राध्यापक भरती हेच आमचं लक्ष हे घोषवाक्य घेऊन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.

प्राध्यापक भरतीसाठी पुन्हा आंदोलन सुरू;  भरतीसाठी उमेदवार आक्रमक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

प्राध्यापक भरतीसाठी (professor recruitment) पुन्हा एकदा संघटना आक्रमक झाल्या आहेत. महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेतर्फे (Maharashtra New Professors Association)उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 100% प्राध्यापक भरती, तासिका तत्वावरील (CHB)प्राध्यापकांना प्रति तास दीड हजार रुपये आणि दरमहा 60 हजार रुपये मानधन द्यावे. तसेच कंत्राटी प्राध्यापकांना 90 हजार रुपये मानधन देण्यात यावे, शासनातर्फे 6 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला प्राध्यापक भरती संदर्भातील अध्यादेश नियमबाह्य असल्याने तो तात्काळ रद्द करावा, आदी मागण्यांसाठी हे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष संदीप पाथ्रीकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे. राज्यभरातील विविध विभागांमधील पात्रता धारक उमेदवार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. ना जात,ना धर्म,ना पक्ष.. प्राध्यापक भरती हेच आमचं लक्ष हे घोषवाक्य घेऊन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.यापूर्वीही महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेसह विविध प्राध्यापक संघटनांनी उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन केले होते.

संदीप पाथ्रीकर म्हणाले, राज्य शासनाकडून प्राध्यापक भरतीबाबत केवळ आश्वासने दिली जातात. परंतु,अद्याप यावर ठोस निर्णय झालेला नाही. शासनातर्फे 6 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला अध्यादेश हा नियमबाह्य असून अनेक पात्र उमेदवारांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 100 टक्के प्राध्यापक भरती करावी. तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी, पदभरतीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केले आहे.