पाचवी,आठवी स्कॉलरशीप परीक्षेची तारीख ठरली; चौथी, सातवीची स्कॉलरशीप परीक्षा कधी?
इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षे संदर्भातील अभ्यासक्रम, अधिकृत सूचना व इतर अनुषंगिक माहिती यथावकाश परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणारा असल्याचे जाहीर केले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती बरोबरच या वर्षी इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. मात्र इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र संबंधित शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास सुरुवात करावी असे आवाहन परीक्षा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे यापूर्वी इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती. परंतु काही वर्षांपूर्वी त्यात बदल करून ही परीक्षा इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यास सुरुवात झाली. परंतु या निर्णयामुळे परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत गेली. त्यामुळे राज्य शासनाने पुन्हा एकदा इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. यावर्षी इयत्ता पाचवी आठवी तसेच इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे.
परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भातील वेळापत्रक जाहीर केले असले तरी इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षे संदर्भातील अभ्यासक्रम, अधिकृत सूचना व इतर अनुषंगिक माहिती यथावकाश परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणारा असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
eduvarta@gmail.com