प्राध्यापक भरती प्रक्रिया 'या' कारणांमुळे रेंगाळणार; पुन्हा जाहिरात द्यावी लागणार... 

राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने 6 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिध्द केलेल्या अध्यादेशानुसार प्राध्यापक भरती करावी लागणार आहे. या अद्यादेशात पीएच.डी. नेट-सेट परीक्षा यासह रिसर्च पेपरला सुध्दा गुण देण्यात आले आहेत. विद्यापीठाने सुमारे दीड वर्षांपूर्वी उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले.मात्र या दीड वर्षांच्या कालावधीत अनेक उमेदवारांनी पीएच.डी. पूर्ण केली. तर काही उमेदवार नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण झाले.

प्राध्यापक भरती प्रक्रिया 'या' कारणांमुळे रेंगाळणार; पुन्हा जाहिरात द्यावी लागणार... 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची (Professors in universities and colleges) रिक्त पदे केव्हा भरणार? याबाबत विविध संघटनांकडून आंदोलने केली जाता असून राज्याच्या उच्च शिक्षण विभागाला (Department of Higher Education)जाब विचारला जात आहे. मात्र,अद्याप त्यावर ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यातच प्राध्यापक भरतीच्या संदर्भात राज्य शासनाने नवीन अध्यादेश प्रसिध्द केला असून नव्या निकषानुसार भरती राबवावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.परंतु, सुमारे एक ते दीड वर्षांपूर्वी राज्यातील विविध विद्यापीठांनी भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले असून त्याची छाननी सुध्दा झाली आहे. मात्र, बदललेले निकष (Changed criteria)आणि यापूर्वीच्या नियमानुसार केलेली अर्जाची छाननी आणि उमेदवारांची या काळात वाढलेली पात्रता या सर्व बाबींचा विचार करता विद्यापीठांना पुन्हा एकदा प्राध्यापक भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. प्राध्यापक भरतीची वाट पाहणाऱ्यांसाठी हे कटू असले तरी वास्तव आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 111 रिक्त पदासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. सुमारे पाच हजाराहून अधिक उमेदवारांनी विद्यापीठाकडे अर्ज केले. पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमानुसार उमेदवारांनी अर्ज केले तसेच विद्यापीठाने सुध्दा त्याचा नियमांचा आधार घेऊन पात्र- अपात्र उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली. परंतु, राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने 6 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिध्द केलेल्या अध्यादेशानुसार प्राध्यापक भरती करावी लागणार आहे. या अद्यादेशात पीएच.डी. नेट-सेट परीक्षा यासह रिसर्च पेपरला सुध्दा गुण देण्यात आले आहेत. विद्यापीठाने सुमारे दीड वर्षांपूर्वी उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले.मात्र या दीड वर्षांच्या कालावधीत अनेक उमेदवारांनी पीएच.डी. पूर्ण केली. तर काही उमेदवार नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. अनेकांनी विविध जर्नलमध्ये रिसर्च पेपर प्रसिद्ध केले.त्यामुळे विद्यापीठाला या उमेदवारांना पुन्हा एकदा आपल्या अर्जात दुरूस्तीची संधी द्यावी लागणार आहे. तसेच या कालावधीत जे उमेदवार प्राध्यापक पदासाठी नव्याने पात्र झाले परंतु त्यांनी अर्ज भरले नाहीत, त्यांनाही अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून द्यावी लागेल . परिणामी प्राध्यापक भरती प्रक्रिया आणखी काही महिने रेंगाळणार हे यावरून स्पष्ट होते. 

सध्या राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमधील विद्यार्थी संख्येवर आधारित प्राध्यापकांच्या रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. गेल्या काही वर्षात व्यावसायीक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून मोठी पसंती दिली जात आहे. त्यामुळे कला, वाणिज्य व विज्ञान या विद्याशाखांच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे प्राध्यापकांची पदे कमी होण्याची शक्यता अधिक आहे, असे असले तरी एनईपीमुळे काही विषयांची संख्या वाढली आहे.मात्र, या विषयांसाठी पदमान्यतेची प्रक्रिया शासनाने पूर्ण केलेली नाही. त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी शासन अनुकूल असले तरी अशा अनेक कारणांमुळे भरती प्रक्रिया रेंगाळणार आहे.

पुढील काही दिवसांत नगरपालिका व महानगर पालिकांच्या निवडणूका घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर शिक्षक व पदवीधर निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांच्या आचार संहितेच्या काळात भरती प्रक्रिया राववता येत नाही. परिणामी या सर्व अडथळ्यांना बाजूला सारून राज्य शासन, उच्च शिक्षण विभाग, विद्यापीठ व शैक्षणिक संस्था यांना लवकरात लवकर प्राध्यापक भरती करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.