विद्यापीठातील पायपीट झाली बंद ; आता बसमधून फिरा फुकट.. 

विद्यापीठाला दत्तक दिलेल्या दोन बस गेल्या काही दिवसांपासून धूळ खात पडल्या होत्या.मात्र,त्या आता रस्त्यावर धावू लागल्या आहेत.विद्यापीठाच्या सर्व प्रमुख विभाग व कार्यालयासमोर बस थांबे ठेवण्यात आले आहेत.

विद्यापीठातील पायपीट झाली बंद ; आता बसमधून फिरा फुकट.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि 'ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' (oxford of the east) अशी ओळख असणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)  411 एकरांच्या विस्तीर्ण परिसरात विखूरलेल्या विविध विभागात कामानिमित्त जायचे म्हणाले की नको- नको वाटते. कारण विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून पायपीट करत विद्यार्थी व प्राध्यापकांना (student and professor) परीक्षा विभागासह विविध प्रशासकीय विभागात जावे लागते.मात्र, विद्यापीठ प्रशासनाने (university administration) हा त्रास कमी केला आहे.विद्यापीठाने प्रवेशद्वारापासून मोफत बस सुविधा (free bus facility) उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विद्यापीठाला दोन बस दत्तक मिळाल्या होत्या.त्या आता विद्यापीठ आवारात अधिक चांगल्या पद्धतीने नियमितपणे फिरू लागल्या आहेत.विद्यापीठाच्या सर्व प्रमुख विभाग व कार्यालयासमोर बस थांबे सुरू केले आहेत. त्यामुळे प्रवेशद्वारापासून सर्व ठिकाणी सहज पोहचणे शक्य झाले आहे. रिक्षा उपलब्ध नसल्यास जेष्ठ नांगरिकांसह विद्यार्थी,पालकांना अनेक अडचणी येत होत्या. परंतु,काही मिनिट वाट पाहिल्यानंतर विद्यापीठाची बस उपलब्ध होत असल्याने विद्यापीठ आवारातील विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा : प्राध्यापक भरतीनंतरच विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन

सकाळी 10.30 वाजता विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून बस प्रवाशांना घेऊन जाते.पर्यावरण विभाग व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ थांबते. पुढे जायकर ग्रंथालय , रसायनशास्त्र विभागामार्गे परीक्षा विभाग ,आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्र , विद्यापीठ मुख्य इमारत,तंत्रज्ञान विभाग, मुलींचे वास्तगीगृह  , हेल्थ सेंटर, एमबीए विभाग, मुलांचे वसतीगृह आणि पुन्हा प्रवेशद्वाराजवळ या मार्गाने सायंकाळपर्यंत या बस फेऱ्या मारतात. त्यामुळे विद्यापीठात प्रवास करणे सर्वांना सुलभ झाले आहे.
-----------------------------

विद्यापीठ प्रशासनातर्फे सध्या विशिष्ठ थांबे करण्यात आले आहेत.मात्र, त्यात वाढ करण्याचा विचार आहे. त्याचाप्रमाणे बस नेमकी कुठे आहे.किती वेळात कोणत्या थांब्यावर पोहचेल यांची माहिती व्हावी, यासाठी विद्यापीठातर्फे अॅप तयार केले जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठात फिरणे आता स्मार्ट होणार आहे,असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. 
--------------------------

"अभ्यासासाठी पुस्तकांच्या झेरॉक्स काढणे, परीक्षेचे हॉल तिकीट प्रिंटआऊट करणे, आदी गोष्टींसाठी लांब जावे लागत होते.परंतु,मोफत बस सुरू झाल्यामुळे आमचा वेळा वाचत आहे. जेवणासाठी मेसाला जाणे, पुन्हा अभ्यासासाठी जयकर ग्रंथालयात येणे सोपे झाले आहे."

- ओम बोधले, विद्यार्थी , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 
-----------------------

"विद्यापीठाने घेतलेला मोफत बस सुविधेचा निर्णय खूप चांगला आहे.मुलींची पायपीट थांबली असून त्यांचा वेळ वाचत आहे.पूर्वी जयकर ग्रंथालयांपासून रात्री मुलींना हॉस्टेलवर घेऊन जाणारी गाडी पुन्हा सुरू करण्यात यावी."
 - उषा कांबळे, विद्यार्थी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ