IISER पुणे येथे आयोजित मुक्तीपर्व कार्यक्रमातील वक्त्यांवर निर्बंध घालण्यात यावे - अभाविप
IISER प्रशासन नेमके काय साध्य करीत आहे? असा प्रश्न देखील अभाविपमार्फत उपस्थित करण्यात आला आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुण्यातील इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुक्तीपर्व हा कार्यक्रम १४ एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अनेक कट्टरपंथी अशा माओवादी चळवळींमध्ये सक्रिय असणाऱ्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले असून यामुळे कार्यक्रमात होणाऱ्या फुटीरतावादी, धार्मिक आणि जातीयवादी टीका टिप्पणीमुळे समाजात तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे असा आरोप अभाविपने केला असून याबाबतचे निवेदन IISER दिले आहे.
'पगदंडी' या प्रकाशनाच्या माध्यमातून अनेक अर्बन नक्सली असल्याचा आरोप असणाऱ्या लेखकांचे पुस्तक प्रकाशन करण्यात आले असून मुक्तीपर्व दरम्यान देखील या पुस्तक प्रकाशनाचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. IISER प्रशासन नेमके काय साध्य करीत आहे? असा प्रश्न देखील अभाविपमार्फत उपस्थित करण्यात आला आहे.
याबरोबरच, ज्या डाव्या विचारांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्यभर विरोध केला त्याच कट्टरवादी लोकांना शैक्षणिक परिसरात स्थान देऊन IISER प्रशासनाला काय साध्य करायचे आहे. मुक्तीपर्व हा कार्यक्रम प्रा.सुहिता नाडकर्णी आणि प्रा.मयुरिका लाहिरी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गेल्या वर्षी झालेल्या मुक्तीपर्वात देखील अनेक धार्मिक आणि जातीयवादी असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने अनेक विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेतला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली पाहिजे परंतु अशा पद्धतीने वादग्रस्त लोकांना आमंत्रित केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने अभाविपने या संदर्भात पोलीस उपायुक्तांना निवेदनाद्वारे वादग्रस्त आणि कट्टरपंथी लोकांना IISER मध्ये येण्यास निर्बंध घालावे अशी मागणी केली आहे.
तसेच यासंदर्भात IISER चे संचालक डॉ. सुनील भागवत यांना देखील निवेदनाद्वारे परिसरात कार्यक्रमांना कोण वक्ते म्हणून येत आहेत? याची चौकशी करूनच अशा कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल अशीही मागणी केली आहे.
"डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये साजरी झालीच पाहिजे. परंतु पुण्यातील IISER मध्ये मुक्तीपर्व या कार्यक्रमात देशविरोधी चळवळीत सहभाग असल्याचे आरोप असलेल्यांना वक्ते आणि अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात येणे दुर्दैवी आहे. IISER ही एक प्रतिष्ठित आणि नामांकित शिक्षण संस्था असून अशा पद्धतीने कट्टरपंथी माओवादी आणि जातीयवादी लोकांना बोलवून या प्रतिमेला आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मलीन करण्याचं काम काही लोकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या आक्षेपार्ह वक्त्यांवर निर्बंध घालून कायदा व सुव्यवस्था राखण्यात यावा" - अथर्व कुलकर्णी, प्रदेश मंत्री, अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश