अकरावी प्रवेशाची फेक वेबसाईट; शासनाची फसवणूक, विद्यार्थ्यांची दिशाभूल 

काहींनी फेक संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी कोणत्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा, शहरातील टॉप कॉलेज कोणते, कोणते महाविद्यालय प्रवेशासाठी चांगले आहे, याबाबतची जाहिरात केली आहे.दरम्यान, शासनाने अद्याप अधिकृत संकेतस्थळ जाहीर केलेले नाही. 

अकरावी प्रवेशाची फेक वेबसाईट; शासनाची फसवणूक, विद्यार्थ्यांची दिशाभूल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून (Department of School Education)इयत्ता अकरावी प्रवेशासाठी (11th admission)राज्यभर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र, याच गोष्टीचा फायदा घेऊन काहींनी अकरावी प्रवेशाची फेक वेबसाईट (Fake website for 11th admission)तयार करून त्यात शासनाचा लोगो,शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (School Education Minister Dada Bhuse)यांचे छायाचित्र आणि इतर माहिती वापरून शासनाची फसवणूक केली आहे. तसेच अद्याप शासनाने अधिकृत वेबसाईट सुरू केलेली नसताना फेक वेबसाईट कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थी याच वेबसाईटला भेट देऊन अकरावी ॲडमिशन संदर्भातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असून  विद्यार्थ्यांची दिशाभूल होत आहे. त्यामुळे शिक्षण विभाग याबाबत संबंधितांवर कारवाई करणार का ?असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, शासनाने अद्याप अधिकृत संकेतस्थळ जाहीर केलेले नाही. 

दहावीचा निकाल केव्हा; राज्य मंडळाच्या अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे यापूर्वी पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती यासारख्या महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात होते. परंतु, चालू शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने राबविले जाणार आहे. त्यामुळे इयत्ता दहावीची परीक्षा देणारे राज्यातील सर्व मंडळाचे सर्व विद्यार्थी अकरावी प्रवेशाचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणार आहेत.

सुमारे 16  लाख विद्यार्थी अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत. याच बाबीचा फायदा घेऊन काहींनी फेक संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी कोणत्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा, शहरातील टॉप कॉलेज कोणते, कोणते महाविद्यालय प्रवेशासाठी चांगले आहे, याबाबतची जाहिरात केली आहे. ही जाहिरात करताना त्यात राज्य शासनाच्या लोगोचा वापर करण्यात आला आहे. फेक वेबसाईटवर आत एक लोगो आणि बाहेर एक लोगो दिला आहे.तसेच या वेबसाईटवर ही अधिकृत वेबसाईट नाही,असेही नमूद केले आहे.मात्र, त्यात वापरलेल्या लोगो व फोटोमुळे विद्यार्थी व पालकांचा गोंधळ उडाला आहे. 

'एज्युवार्ता ' ने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना या संदर्भातील माहिती निदर्शनास आणून दिली आहे. फेक वेबसाईड 11thadmissionorg.com या नावाने तयार करण्यात आली आहे. शासनाने अद्याप आपली वेबसाईट जाहीर केलेली नाही. त्यामुळे शिक्षण विभाग यावर काय कारवाई करणार?  हे पाहणे उत्सुकतेचे आहे.