वंदे मातरम्’च्या दीडशतक पूर्तीनिमित्त ‘संगीत आनंदमठ’ नाटकाचा प्रयोग -राजेश पांडे
देशभक्तीचा ओज, सुरेल संगीत आणि कलात्मक सादरीकरण यांचा संगम असलेले हे नाटक प्रेक्षकांना ‘वंदे मातरम्’च्या आत्म्याशी साक्षात्कार घडवेल.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणादायी ठरलेल्या 'वंदे मातरम्' या गीताला यंदा दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्रभावनेची चेतना जागवणाऱ्या या गीताच्या स्मृतीनिमित्त पुणे पुस्तक महोत्सव, वंदे मातरम् सार्धशती जयंती समारोह समिती, जन्मदा प्रतिष्ठान यांच्या वतीने ‘वंदे मातरम्’चा उत्सव येत्या शुक्रवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात साजरा होणार आहे. यावेळी 'संगीत आनंदमठ’ या नाटकाचा प्रयोग, तर 'ध्यास वंदे मातरम्चा’ या ग्रंथाचे प्रकाशन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच केंद्रीय नागरी वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत,असे पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.
राजेश पांडे म्हणाले, वंदे मातरम् गीताला १५० वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवात पुणेकरांना सामील होता येण्यासाठी दोन महत्त्वाचे कार्यक्रम शुक्रवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहेत. उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ऋषितुल्य कवी बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या अजरामर 'आनंदमठ' कादंबरीवर आधारित ‘संगीत आनंदमठ’ या नाटकाचा प्रयोग. या नाटकाचे नाट्यरूपांतर विनिता तेलंग यांनी केले असून, दिग्दर्शन रवींद्र सातपुते यांचे आहे.
फेब्रुवारी २०२५ मध्ये राज्यनाट्य संगीत स्पर्धेत या नाटकाने सांघिक प्रथम पारितोषिकासह आठ प्रथम पुरस्कार मिळवले आहेत. देशभक्तीचा ओज, सुरेल संगीत आणि कलात्मक सादरीकरण यांचा संगम असलेले हे नाटक प्रेक्षकांना ‘वंदे मातरम्’च्या आत्म्याशी साक्षात्कार घडवेल. या प्रसंगी वंदे मातरम्चे अभ्यासक मिलिंद सबनीस लिखित आणि विश्वकर्मा पब्लिकेशन्स प्रकाशित 'ध्यास वंदे मातरम्चा’ या ग्रंथाचे प्रकाशन होणार असून, या ग्रंथातून गीताचा जन्म, त्यामागील राष्ट्रजागरणाची पार्श्वभूमी आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्याची क्रांतिकारी छटा उलगडली जाणार आहे, असेही राजेश पांडे यांनी सांगितले.
--------------------------
ऋषितुल्य कवी बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या लेखणीतून ७ नोव्हेंबर १८७५ रोजी उमटलेले ‘वंदे मातरम्’ हे गीत केवळ राष्ट्रीय गीत नाही, तर भारतीय आत्म्याचे प्रतीक आहे. या दोन शब्दांनी गुलामगिरीतही स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित केली आणि आजही तीच ज्योत नव्या पिढ्यांना प्रेरणा देते. स्वातंत्र्याच्या संघर्षातील त्या पवित्र भावनेला नमन करत ‘संगीत आनंदमठ’चा हा कार्यक्रम म्हणजे संगीत, साहित्य आणि स्वातंत्र्याचा संगम ठरणार आहे. यावेळी पुणेकरांच्या उपस्थितीत ‘वंदे मातरम्’च्या स्वरांतून भारतमातेचा जयघोष पुन्हा एकदा गुंजणार आहे, असे राजेश पांडे यांनी सांगितले.
eduvarta@gmail.com