'पीआरएन अनब्लॉक' साठी थोडे दिवस थांबा; 5 नोव्हेंबरपर्यंत परिपत्रक काढणार
२०१५ पॅटर्न पासूनच्या, एक किंवा २ विषय अनुत्तीर्ण असलेले आणि पॅटर्न चेंज झालेल्या अशा एकूण १६ हजार विद्यार्थ्यांच्या संदर्भातही निर्णय घेण्याचे सर्वाअधिकार विद्यापीठाच्या कुलगुरूंना देण्यात आले आहेत. UGC च्या नियमांच्या अधीन राहून या विद्यार्थ्यांना देखील लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुढील आठवड्यात या संदर्भातील सविस्तर परिपत्रक विद्यापीठाकडून काढले जाणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला असला तरी त्यासं दर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध होण्यास आणखी काही दिवस थांबावे लागणार आहे.पुणे,अहिल्यानगर व नाशिक या तीन जिल्ह्यातील सुमारे 96 हजार विद्यार्थ्यांना विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. मात्र, यापूर्वी पीआरएनचा लाभ मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी दिली जाणार का? महाविद्यालयांनी कोणत्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून घ्यावे, याबाबत येत्या 5 नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठातर्फे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे,असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बुधवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सत्र पूर्तता संपलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. N + 2 या फॉर्म्युलाला 1 वर्ष अधिक वाढ देण्यास विद्यापीठाच्या विद्या परिषदेने मंजुरी दिल्यानंतर हा ठराव बुधवारी मॅनेजमेंट काउन्सिलसमोर आला होता. यास एकमताने मंजुरी देण्यात आली. याशिवाय, २०१५ पॅटर्न पासूनच्या, एक किंवा २ विषय अनुत्तीर्ण असलेले आणि पॅटर्न चेंज झालेल्या अशा एकूण १६ हजार विद्यार्थ्यांच्या संदर्भातही निर्णय घेण्याचे सर्वाअधिकार विद्यापीठाच्या कुलगुरूंना देण्यात आले आहेत. UGC च्या नियमांच्या अधीन राहून या विद्यार्थ्यांना देखील लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुढील आठवड्यात या संदर्भातील सविस्तर परिपत्रक विद्यापीठाकडून काढले जाणार आहे. त्यांनंतर महाविद्यालयातील परीक्षा प्रमुख आणि प्राचार्य यांमच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. तसेच सत्र पूर्तता वाढवून देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा स्वतंत्रपणे नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये घेतली जाणार आहे. त्याचे सविस्तर वेळापत्रक परीक्षा विभागाकडून काढले जाणार आहे.
________
विद्यापीठाने वेळोवेळी विद्यार्थी हिताचे निर्णय घेतले आहेत. त्याचा हजारो विद्यार्थ्यांनी लाभही घेतला आहे. शैक्षणिक गुणवत्ता अबाधित ठेवण्यासाठी अशी सवलत यापुढे देण्यात येवू नये, अशीही मागणी काही शैक्षणिक घटकांकडून केली जात आहे. त्यामुळे ही शेवटची संधी आहे, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
- सागर वैद्य, सदस्य, व्यवस्थापन परिषद,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
-------------------
विद्या परिषदेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावावर व्यवस्थापन परिषदेत चर्चा करून 96 हजार विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला.लवकरच याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले जाईल.त्यानंतर प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरून परीक्षा देता येईल. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन अपूर्ण राहिलेली पदवी पूर्ण करावी.
- डॉ. डी.बी. पवार, सदस्य, व्यवस्थापन परिषद,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
eduvarta@gmail.com