शिक्षकांचा वापर निवडणुकीच्या प्रचारासाठी केल्यास याद राखा.....

नाशिकचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाचा संदर्भ देऊन नाशिक जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

शिक्षकांचा वापर निवडणुकीच्या प्रचारासाठी केल्यास याद राखा.....

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

निवडणूक आयोगाने (Election Commission) महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम (Assembly Election Program)जाहीर केला असून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, या कालावधीत खाजगी अनुदानित सहकारी संस्था व शिक्षण संस्थांमधील मनुष्यबळाचा वापर निवडणुकीच्या प्रचारासाठी केला जातो. परंतु, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा (Teaching and non-teaching staff)वापर राजकिय प्रचारासाठी (For political campaigning)केल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा नाशिकच्या जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील (Praveen Patil, Secondary Education Officer, Zilla Parishad, Nashik)यांनी दिला आहे. 

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे काही निर्बंध लागू झाले आहेत. नाशिकचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाचा संदर्भ देऊन नाशिक जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची निवडणूक प्रक्रिया 15 ऑक्टोबर पासून जाहीर झाले असून आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी सुरू झाली आहे. याकरिता आपल्या अधिनस्त येणाऱ्या सर्व प्रकारच्या खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांचा त्यांना नेमून दिलेल्या कामकाजासाठीच वापर करावा, असे स्पष्ट नमूद केले आहे.

संबंधित कर्मचाऱ्यांचा वापर त्यांना नेमून दिलेल्या कामकाजासाठी केला जात आहे, याबाबतचे लेखी हमीपत्र ऑक्टोबर 2024 च्या वेतन देयकासोबत जोडण्यात यावे.  कोणत्याही परिस्थितीत खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कार्यरत कर्मचाऱ्यांचा राजकीय उमेदवारांच्या प्रचारासाठी वापर केल्यास आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.