शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; पेपर लीकच्या पार्श्वभूमीवर विरोधक आक्रमक

पेपर लिकच्या मुद्यावर आता विरोधी पक्षाने मोदी सरकारवर निशाणा साधत थेट शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु केली आहे.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; पेपर लीकच्या पार्श्वभूमीवर विरोधक आक्रमक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

NEET नंतर आता NET च्या पेपर लिकच्या पार्श्वभूमीवर आता देशात राजकीय नाट्य रंगू लागलं आहे. पेपर लीकच्या मुद्यावर आता विरोधी पक्षाने एनडीए सरकारवर निशाणा साधत थेट शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत, NEET मधील कथित अनियमितता आणि UGC-NET रद्द केल्याबद्दल सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मूळ संघटना म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी(RSS) संबंधित लोकांनी शैक्षणिक संस्थांवर कब्जा केल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही परिस्थिती बदलल्याशिवाय पेपरफुटी थांबणार नाही, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) रशिया-युक्रेन, इस्रायल-गाझा युद्ध थांबवतात, पण पेपरफुटी थांबवू शकत नाहीत किंवा थांबवू इच्छित नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला . मध्य प्रदेशात झालेला 'व्यापम' घोटाळा देशभर पसरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. गांधी म्हणाले, "कोणतेही काम मनमानी पद्धतीने करू नये, जे नियम एका पेपरला लागू होतात तेच नियम दुसऱ्या पेपरलाही लागू झाले पाहिजेत."

तर दुसरीकडे भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे (CPIM) सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी एनटीए(NTA) रद्द करण्याची आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याबरोबर बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी दावा केला आहे की, NEET “पेपर लीक” प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांच्याशी संबंधित लोकांशी संबंध आहेत आणि त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, विविध विद्यापीठांतील अनेक विद्यार्थी आणि UGC-NET परीक्षा रद्द केल्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विविध विद्यार्थी संघटनांच्या सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्रालय आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर रोखण्यात आले होते.