महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग; UGC कडून राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना सुरू

राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना (NATS 2.0) पोर्टल https://nats.education.gov.in/ लाँच केले आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग; UGC कडून राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ट्रेनिंग सोबतच प्रत्यक्ष कामाचाही अनुभव मिळावा या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना (NATS 2.0) पोर्टल https://nats.education.gov.in/ लाँच केले आहे. या योजनेंतर्गत पदवीधर, डिप्लोमा विद्यार्थी आणि व्यावसायिक प्रमाणपत्र धारकांना (Graduate diploma students and professional certificate holders) 'ऑन-जॉब ट्रेनिंग'ची (On-Job Training) संधी देण्यात येणार आहे. तसेच OJT चा कालावधी सहा महिने ते एक वर्ष असणार आहे.

NATS 2.0 पोर्टल उमेदवारांना प्रशिक्षणार्थी संधींसाठी योग्य कंपनी शोधण्यात मदत करेल. यासोबतच हे उमेदवारांना प्रशिक्षणार्थीशी संबंधित नोंदणी आणि अर्ज, नोकरीची जाहिरात, करार तयार करणे, प्रमाणपत्र आणि स्टायपेंड वितरण आदी सर्व उपक्रमांसाठी सर्वसमावेशक उपाय देखील प्रदान करेल. विशेष म्हणजे शिष्यवृत्तीसाठी स्टायपेंड नियमांनुसार लागू होईल आणि पोर्टलद्वारे थेट लाभ हस्तांतरण  डिबीटीद्वारे (DBT) वितरित केले जाईल.

केंद्र सरकारच्या नॅशनल फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत तरुणांना विविध विषयांमध्ये कौशल्य प्रदान करण्याच्या उद्देशाने NATS कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. NATS 2.0 पोर्टलचा उच्च शिक्षण संस्थांना (HEIs) फायदा होईल. कारण ते त्यांच्या विद्यार्थ्यांना व्यवसायिकांशी जोडेल आणि संबंधित कौशल्ये आणि व्यावहारिक अनुभवाद्वारे त्यांची रोजगारक्षमता वाढवेल.