छत्रपती शिवाजी महाराज हे देशातील पहिल्या कृषी क्रांतीचे जनक - माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे

या परिषदेत ७५ पेक्षा अधिक शोधनिबंध सादर करण्यात येणार आहेत. तसेच विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशनही करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज हे देशातील पहिल्या कृषी क्रांतीचे जनक - माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे देशातील पहिल्या कृषी क्रांतीचे जनक होते, असे मत माजी खासदार आणि इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे माजी अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे (former MP Vinay Sahastrabuddhe) यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन व कार्याचे २१ व्या शतकातील महत्त्व आणि समयोचितता या परिषदेच्या उद्घाटन (Inauguration of the conference) सत्रात व्यक्त केले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दि. ३० ऑगस्ट आणि ३१ ऑगस्ट अशा दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहस्त्रबुद्धे यांनी बोलताना, "शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने युगनिर्माता होते. भारताचा इतिहास छत्रपतींपूर्वीचा आणि नंतरचा असा विभागता येईल. त्यांनी वित्त, सामाजिक, सांस्कृतिक, रणनिती, कृषी क्षेत्रात क्रांती केली. त्याचा प्रभाव संपूर्ण भारतात होता त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर निरंतर चिंतन करणे गरजेचे आहे. भारतीय नौदल आणि गुप्तवार्ता विभागाचे ते प्रवर्तक होते." असे म्हटले .

तसेच स्वतःच संपत चाललेल्या राजकारण्यांनी सोयिस्करपणे छत्रपती शिवाजी महाराजांना जात आणि धर्माच्या भिंतीत विभागले, अशी खंत विखे पाटील यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, "छत्रपतींना केवळ परिसंवादापर्यंत सिमीत न ठेवता सुराज्य, सुशासन, समृद्धी, राष्ट्रकल्याण आणि लोककल्याणकर्ता राजा म्हणून अभ्यासायाल हवे. स्वराज्य स्थापनेनंतर सुराज्याची बिजे त्यांनी पेरले. महाराजांच्या किर्तीमुळे आपल्या सर्वांचा गौरव होत आहे. गुलामगिरीमुळे समाजातील हरवलेला आत्मविश्वास महाराजांनी जागा केला."

या परिषदेला यावेळी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रीय परिषदेचे बीजभाषक डॉ. सदानंद मोरे, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी,  प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, वित्त व लेखाधिकारी चारुशीला गायके, अमृतमहोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, विद्यापीठ अधिकार मंडळाचे सदस्य आदी मान्यवर तसेच शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

या परिषदेत ७५ पेक्षा अधिक शोधनिबंध सादर करण्यात येणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमात विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशनही करण्यात आले. तसेच यावेळी इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील नव्या सभागृहाचे उद्घाटन झाले. सज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, तत्वज्ञान विभाग, बहिःशाल विभाग, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, डेक्कन  महाविद्यालय (अभिमत), भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. हरीश नवले यांनी केले आणि आभार प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यानी मानले.