बार्टीचा नवा उपक्रम, भीम काव्यांचे करणार संकलन 

साहित्याला पुर्नजिवीत करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 

बार्टीचा नवा उपक्रम, भीम काव्यांचे करणार संकलन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची जयंती नुकतीच पार पडली. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बार्टी या शिक्षण संस्थेकडून (Barty Institute of Education) डॉ.आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित विविध भाषांमधील भीम काव्यांचे संकलन (A collection of Bhima poems) हा नवा उपक्रम राबवण्यात येणार आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव जसा सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रावर पडला तसाच तो साहित्यिक क्षेत्रावर पडला. प्रारंभिक काळात महाराष्ट्रातील साहित्यिकांनी कविता, कथा, नाटक, आत्मचरित्र इत्यादी लेखन प्रकारातून विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती केली. या साहित्याला पुर्नजिवीत करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 

विविध भाषा तसेच बोलीभाषेमध्ये देखील अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात साहित्यनिर्मिती झाली. हे विचार जनसामान्य माणसापर्यंत पोहचविण्यात कवी, गायक, शाहीर, साहित्यिक, कलावंतांचे मोठे योगदान आहे. या सर्वांच्या कार्याची दखल घेऊन त्यांनी लिहिलेले साहित्याचे संकलन करण्यात येणार आहे. सर्व प्रकारचे काव्य संकलन करून महामानव विश्वकाव्य दर्शन हा काव्यसंग्रह संपादित करुन ग्रंथरुपाने प्रकाशित करण्यात येणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे. 

विविध भाषेतील काव्य निर्माण केलेले असल्यास याची प्रत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) २८ क्विन्स गार्डन पुणे या पत्यावर किंवा vishwakavyabarti@gmail.com या मेल आयडीवर ३१ मेपर्यंत आपले काव्य पाठवावे. सदर कविता साहित्यिकांच्या नावाने बार्टी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असे बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी सांगितले आहे.