एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंब्रिज विद्यापीठाच्या ऐतिहासिक केंब्रिज युनियन सोसायटीच्या (Cambridge Union Society at Cambridge University) अध्यक्षपदी अनुष्का काळे (Anushka Kale)या ब्रिटिश- भारतीय विद्यार्थिनीची निवड झाली आहे. सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ही विद्यार्थिनी 126 मते मिळवत पुढील इस्टर 2025 टर्मसाठी बिनविरोध निवडून आली आहे.
अनुष्का काळे केंब्रिज विद्यापीठाच्या सिडनी-ससेक्स कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्याचा अभ्यास करत आहे. पदभार स्विकारल्यानंतर अनुष्का म्हणाली, "माझ्या कार्यकाळात, मी युनिव्हर्सिटीच्या इंडिया सोसायटीसारख्या सांस्कृतिक गटांसोबत अधिक सहकार्य करून युनियनची विविधता आणि पोहोच वाढवण्याचा प्रयत्न करेन. मी आंतरराष्ट्रीय वक्ते आणि जागतिक वादविवाद कार्यक्रमांचे आयोजन करेन."
केंब्रिज युनियन सोसायटी 1815 साली अस्तित्वात आली होती. ही संस्था जगातील सर्वात जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. केंब्रिज युनियन सोसायटीच्या माजी अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांमध्ये प्रख्यात इंग्रजी अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ जॉन मेनार्ड केन्स, कादंबरीकार रॉबर्ट हॅरिस आणि अलीकडच्या काही वर्षांत ब्रिटिश इंडियन पीअर आणि कोब्रा बीअरचे संस्थापक करण बिलिमोरिया यांचा समावेश आहे.