NEET ची तयारी करणाऱ्या कोटातील विद्यार्थ्यीनीची 9 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या  

शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या महिलेने तिला गॅलरीतून उडी मारताना पाहिले. महिलेला काही समजण्यापूर्वीच विद्यार्थिनीने उडी घेतली.

NEET ची तयारी करणाऱ्या कोटातील विद्यार्थ्यीनीची 9 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

स्पर्धा परीक्षेसाठी परिचित असलेले कोटा शहर (Kota City) सध्या वेगळ्याच कारणामुळे पुढे येताना दिसत आहे. NEET ची तयारी करत असलेल्या मध्यप्रदेश  येथील एका विद्यार्थिनीने तिच्या अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide of a student) केली. त्यामुळे कोटा शहर पुन्हा एकदा हादरले आहे. शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या महिलेने तिला गॅलरीतून उडी मारताना पाहिले. महिलेला काही समजण्यापूर्वीच विद्यार्थिनीने उडी घेतली. NEET चा निकाल एक दिवस आधी आला होता. कमी गुण मिळाल्याने ती नैराश्याने ग्रासली होती. शंका दूर करण्यासाठी ती बुधवारी दुपारी वर्गातही गेली. कोटा (राजस्थान) येथील जवाहर नगर भागात बुधवारी दुपारी ४ वाजता ही घटना घडली.

जवाहर नगर पोलीस स्टेशनचे अधिकारी हरिमोहन शर्मा यांनी सांगितले, बगिशा तिवारी (वय 18) ही मध्य प्रदेशातील गुढ (अनंतपूर) येथील रहिवासी होती. ती कोटा येथील जवाहर नगर भागात पुखराज एलिमेंट बिल्डिंगच्या नवव्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक 503 मध्ये आई आणि लहान भावासोबत एकत्र राहत होती. बगिशा 3 वर्षांपासून NEET ची तयारी करत होती. तिचा भाऊ अकरावीत शिकतो. तो जेईईची तयारीही करत आहे. विद्यार्थ्यीनीचा NEET चा निकाल एक दिवस आधी आला होता. या परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून तिने हे पाऊल उचलले जात असल्याचे बोलले जात आहे. 

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये विद्यार्थी उडी मारताना दिसत आहे. एका महिलेने तिला फ्लॅटमधून बाहेर येताना पाहताच बगीशाने उडी घेतली. कोटा येथील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरलेले पोलीस प्रशासन आता त्यांना घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. कोटा एसपी अमृता दुहान यांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर धमकी दिली आहे की, घटनेच्या व्हिडिओवरून कल्पना घेऊन जर कोणी आत्महत्या केली तर सीसीटीव्ही चालवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. 

विद्यार्थी खाली पडताच घटनास्थळी गर्दी जमली होती. इमारतीच्या सुरक्षा रक्षकासह आजूबाजूचे दुकानदार व रस्त्यावरून जाणारे नागरिक धावून आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तिला खासगी रुग्णालयात घेऊन जात असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलीस इमारतीच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरेही स्कॅन करत आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. 

बगिशाचा भाऊ पार्थने सांगितले, आम्ही दोघे बुधवारी सकाळी कोचिंगला गेलो होतो. दुपारी 12 वाजता घरी परतलो. बगिशा ही दुपारी दोन वाजता वर्गात गेली होती. तिने आईला कोचिंगवरून परत येऊन जेवण करायला सांगितले होते. दुपारी ३.४५ च्या सुमारास मी तिला मेसेज केला आणि विचारले की ती किती वाजता येणार आहे. ती म्हणाली, मी वर्गात आहे आणि काही वेळाने येईन. आई स्वयंपाक करू लागली. काही वेळाने आजूबाजूचे लोक आले आणि त्यांनी बगिशा इमारतीखाली पडल्याचे सांगितले.