दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दहा मिनिटे वाढीव वेळ

प्रश्नपत्रिका सोडवण्यास विद्यार्थ्यांना पेपर सुरू झाल्यावर पुढे अधिकाचा अवधी मिळणार आहे.

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दहा मिनिटे वाढीव वेळ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education: hsc -ssc) इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दहा मिनिटे वाढीव वेळ (10 minutes extra time for class 12th & 10th students ) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवण्यास विद्यार्थ्यांना पेपर सुरू झाल्यावर पुढे अधिकाचा अवधी मिळणार आहे. राज्य मंडळातर्फे या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयता बारावी  व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांना  प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा केंद्रांवर  प्रश्नपत्रिकांचे वाटप हे परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर केले जात होते. इ. १० वी व इ. १२ वी च्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत.अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती.

मात्र विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या नियोजित वेळेनंतर गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षांसाठी दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात येत आहे. फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षांचे वेळीही सकाळ सत्रात सकाळी ११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी ३.०० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल.सकाळ सत्रात सकाळी १०.३० वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी २.३० वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.