महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता निवडणूक साक्षरता अभ्यासक्रम; ॲम्बेसेडर नियुक्त करण्याचे आदेश

शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित कॅम्पस ॲम्बेसेडर नियुक्त करावेत.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता निवडणूक साक्षरता अभ्यासक्रम; ॲम्बेसेडर नियुक्त करण्याचे आदेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता (Electoral literacy among students) वाढविण्यासाठी विद्यापीठांनी विविध विद्याशाखेतील विद्यार्थ्यांसाठी मतदार शिक्षण व निवडणूक साक्षरतेचे अभ्यासक्रम (Voter Education and Electoral Literacy Courses)तयार करून त्यासाठी आवश्यक ते श्रेयांक द्यावेत. त्याचप्रमाणे इलेक्टोरन लिटरसी क्लब या उपक्रमाअंतर्गत नोडल शिक्षकाचे ऑनलाईन / ऑफलाइन प्रशिक्षण आयोजित करून शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित कॅम्पस ॲम्बेसेडर (Campus Ambassador) नियुक्त करावेत. तसेच स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने मॉक मतदान ईव्हीएम, व्हीव्हीपॅट (EVM, VVPAT) यांचे प्रात्यक्षिके आणि निवडणूक साक्षरतेबाबत स्पर्धा आयोजित कराव्यात, असे राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अध्यादेशाद्वारे स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता व्हावी याकरिता केंद्रीय निवडणूक आयोग व केंद्रीय शिक्षण मंत्रालयामध्ये सामाजिक करार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सर्व अकृषी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय यांच्या स्तरावर निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार निवडणूक साक्षरतेच्या अनुषंगाने अध्यापन करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करावे.  यु-डायस आणि अन्य डेटाबेस च्या सहाय्याने महाविद्यालयातील 17 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नोंद घेऊन 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन मतदार नोंदणी अर्ज भरून मतदान ओळख पत्र देण्याबाबत कार्यवाही करावी.

हेही वाचा : शाळेतील शाकाहारी, मांसाहारी विद्यार्थी ओळखले जाणार हिरव्या, लाल रंगाच्या ठिपक्याने

भावी मतदारांना देशाच्या निवडणूक व्यवस्थित पूर्णपणे परिचित करून द्यावे. त्यांच्यामध्ये मतदार म्हणून नोंदणी करण्याची आणि प्रत्येक निवडणुकीत उत्कट माहितीपूर्ण आणि नैतिक पद्धतीने भाग घेण्याची इच्छा निर्माण करावी.  विद्यार्थ्यांमध्ये मतदार जागृती करण्यासाठी इतर सह अभ्यासात्मक उपक्रमाच्या अनुषंगाने महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब निर्माण करावेत. 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन घोषित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांद्वारे मतदार जागृती मोहीम हाती घ्यावी.

कंटिन्यूअस इलेक्ट्रॉल अँड्रॉसी एज्युकेशन मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी क्रेडिट सिस्टीम तयार करावी. नैतिक मतदानाच्या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी आणि विद्यार्थी संघटना स्तरावर मुक्त निष्पक्ष आणि प्रलोभनमुक्त नैतिक निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी महाविद्यालय विद्यापीठामध्ये जेथे जेथे विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका घेतल्या जातात.  तेथे निवडणूक साक्षरता जागरूकता कार्यक्रम सुरू करावेत, असेही या अध्यादेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.