बोर्डातील टॉपर झाली चेहऱ्यावरील केसांवरून ऑनलाइन ट्रोलिंगची शिकार

प्राची निगम या विद्यार्थिनीला तिच्या चेहऱ्याच्या केसांमुळे भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

बोर्डातील टॉपर झाली चेहऱ्यावरील केसांवरून ऑनलाइन ट्रोलिंगची शिकार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

तीने 10 वी बोर्डाच्या परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळवला. फक्त राज्यात नव्हे तर देशभरात सोशल मीडियावर या गुणी मुलीचे फोटो आणि तिला मिळालेले गुण व्हायरल होऊ लागले. पण तीने मिळवलेल्या यशाचे कौतुक होण्याऐवजी नेटकरी तिला ट्रोल करू लागले. तिच्यावर ओंगळ आणि असभ्य टिप्पण्या होऊ लागल्या. स्वतःला पुढारलेले म्हणावणाऱ्यांनी महिलांवर लादलेल्या मनमानी सौंदर्य मानकांच्या पट्टीवर या गुणी मुलीला तोलू लागले. एकीकडे महिलांनी सुशिक्षित, स्वावलंबी व्हावे म्हणून सर्व स्थरातून प्रयत्न होत असताना उत्तर प्रदेशात 10 वी मध्ये टॉप (Top in Uttar Pradesh 10th)केलेल्या 98.50 टक्के गुण मिळवणाऱ्या प्राची निगम (Prachi Nigam)या विद्यार्थिनीला भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तिला तिच्या चेहऱ्याच्या केसांमुळे ट्रोलला सामोरे जावे लागले होते. गेल्या शनिवारी यूपी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर, प्राची तिच्या चेहऱ्यावरील केसांवरून ऑनलाइन ट्रोलिंगची शिकार (online trolling victim)झाली.

दहावी , बारावी मध्ये शिकणाऱ्या आपल्या पाल्याला पारीक्षेत घवघवित यश मिळो, बोर्डाच्या परीक्षेत रँक मिळवून आपल्या पाल्याने समाजात आपले नाव उज्वल करावे, अशी सर्वच पालकांची इच्छा असते. विद्यार्थी देखील आपल्या पालकांचे स्वप्न खरे करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतात. काही विद्यार्थी तर अपयश पचवू न शकल्या मुळे आत्महत्ये सारखे पाऊल देखील उचलतात. मात्र, याच्या विपरीत आपल्या दिसण्याचा बाऊ न करता एक मुलगी जिद्दीने अभ्यास करून नेत्रदीपक यश मिळवते, पण हा समाज मात्र तिच्या गुणांपेक्षा तिच्या दिसण्याला लक्ष करून तिला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचे भयवह चित्र सध्या दिसत आहे.

दरम्यान, एका कंपनीने प्राचीच्या ट्रोलिंग वरून स्वतःची पोळी भाजण्याचे काम केले. बॉम्बे शेव्हिंग कंपनीने एका वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर प्राचीच्या समर्थनार्थ जाहिरात प्रसिद्ध केली. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि अनेक यूजर्सनी कंपनीला ट्रोलही केले. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्राचीला कंपनीवर खटला भरण्यास सांगितले आहे. या कंपनीने सुरुवातीला प्राचीचे समर्थन केले असले तरी जाहिरातीच्या शेवटी प्राचीला कंपनीचे रेजर वापरण्याचा सल्ला दिला आहे. प्राची निगमचे नाव शेव्हिंग कंपनीच्या 'नेव्हर गेट बुलीड कॅम्पेन'मध्ये वापरले गेले होते. 

प्राचीने या ट्रोलर्स पुढे हार मानली नाही. तीने सभ्य भाषेत त्यांना चोख उत्तर दिले आहे.  प्राची  तिच्या चेहऱ्यावरील केसांबद्दल तिला ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देत म्हणाली, "जेव्हा मी पाहिले की लोक मला ट्रोल करत आहेत, तेव्हा मला फारसा त्रास झाला नाही. जेव्हा यूपी बोर्डाच्या परीक्षेत टॉपर म्हणून माझा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला, तेव्हा काही लोकांनी मला ट्रोल केले. त्यावेळी मला सपोर्ट करणारे लोकही होते. मी त्या सर्वांचे आभार मानू इच्छिते."

प्राची म्हणाली, ज्यांना माझ्या चेहऱ्याचे केस विचित्र वाटतात ते ट्रोल करत राहू शकतात, त्यामुळे मला काही फरक पडत नाही. चाणक्यलाही त्याच्या लूकसाठी ट्रोल करण्यात आले. पण त्याचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही."  प्राची च्या या धैर्याचे सगळीकडे कौतुक होत असले तरी, तिच्या दिसण्यावरून तिच्यावर होणारी टिका सुशिक्षित, पुढारलेल्या समाजाचे प्रतिबिंब समजले जाते. ही खेदाची बाब आहे.