प्राध्यापकांची रिक्त पदे भरा ; युजीसीने पुन्हा सुनावले, 31 जुलैपूर्वी माहिती सादर करण्याचे आदेश
रती प्रक्रियेची स्थिती विद्यापीठात अनुदान आयोगाच्या http://www.ugc.ac.inluamp/ या पोर्टलवर 31 जुलै पर्यंत सादर करावी,असे पत्रकात नमूद केले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागांचा (Vacancies of Professors) प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यातच आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission)सर्व विद्यापीठे व अभिमत विद्यापीठे व विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना (Universities and Deemed Universities and University Affiliated Colleges)प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच येत्या 31 जुलै पर्यंत प्राध्यापकांच्या रिक्त पदासंदर्भातील स्थिती युजीसीच्या पोर्टलवर (portal of UGC)भरावी,अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राज्य शासन याबाबत गांभीर्याने निर्णय घेणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे व विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमधील रिक्त पदे भरण्याबाबत वेळोवेळी निर्देश दिले आहेत. 4 जून 2019 ,31 जुलै 2019 ,7 ऑगस्ट 2019, 5 सप्टेंबर 2019 ,22 ऑक्टोबर 2019, 26 नोव्हेंबर 2021 या या तारखांना पत्रक काढून प्राध्यापकांची पदे भरण्याबाबत सूनच्या दिल्या आहेत. युजीसीने आता सहाव्यांदा प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात सर्व विद्यापीठांच्या कुलपतींना व सर्व महाविद्यालयांच्या संस्थाचालकांना व प्राचार्यांना आदेश दिले आहेत, यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी या संदर्भातील पत्र प्रसिद्ध केले आहे.
यूजीसीच्या पत्रकानुसार सर्व विद्यापीठे ,सर्व अभिमात विद्यापीठे, तसेच विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांनी गांभीर्याने पावले उचलत प्राध्यापकांची रिक्त पदे भरावीत. त्याचप्रमाणे भरती प्रक्रियेची स्थिती विद्यापीठात अनुदान आयोगाच्या http://www.ugc.ac.inluamp/ या पोर्टलवर सादर करावी,असे पत्रकात नमूद केले आहे.
महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये रिक्त 2 हजार 88 पदांच्या भरतीची प्रक्रिया नुकतीच राबविण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 111 पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. मात्र,महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची काही हजार पदे रिक्त आहेत. त्यामुळे राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडून या पदांच्या भरती प्रक्रियेबाबत निर्णय घेतला जाणार आहे का ? याबाबत उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील महाविद्यालयांमधील शंभर टक्के रिक्त पदांवर प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवावी, या मागणीसाठी प्राध्यापक संघटनेने उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलनही केले होते.
-----------------

eduvarta@gmail.com