पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार; विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत
विद्यापीठाची पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University)पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा (Pre-PhD Admission Test) सुमारे महिन्याभारापूर्वी घेण्यात आली. परीक्षेचा निकाल 12 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला.त्यामुळे प्रवेश प्रक्रिया केव्हा जाहीर होणार याची विद्यार्थी प्रतीक्षा करत आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना आणखी काही दिवस पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया (Ph.D. Admission process)सुरू होण्याची वाट पहावी लागणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे.
विद्यापीठातील विविध विभाग व पुणे ,अहमदनगर व नाशिक जिलह्यातील संलग्न संशोधन केंद्रातील पीएच.डी.प्रवेशासाठी विद्यापीठातर्फे 31 ऑगस्ट रोजी पीएच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सुमारे १० हजार ७०० विद्यार्थ्यांपैकी ९ हजार १२८ विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून परीक्षा दिली. या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 761 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर 6 हजार 346 विद्यार्थी अपात्र ठरले. पात्र, विद्यार्थी पीएच.डी. प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.मात्र, विद्यापीठाने अद्याप प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले नाही.
विद्यापीठ अनुदान आयोगाने युजीसी- नेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे पीएच.डी. प्रवेश दिला जाणार असल्याचे जाहीर केले होते.परंतु, नेट पेपर फूटीच्या प्रकरणामुळे परीक्षा लांबली. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील बहुतांश सर्व विद्यापीठांनी पीएच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा घेतली.आता नेट परीक्षेचा निकालही लवकरच जाहीर होणार आहे.त्यामुळे या विद्यार्थ्यांना सुद्धा पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे.त्यातच काही प्राध्यापकांकडे पीएच.डी.च्या जागा रिक्त राहिल्या आहेत. त्याचाही आढावा विद्यापीठातर्फे घेतला जाणार आहे. परिणामी विद्यापीठाची पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.