राज्यात एमबीबीएसच्या ६०० जागा वाढल्या; ६ नव्या महाविद्यालयांना केंद्राची मंजूरी
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथसह अमरावती, हिंगोली, वाशिम, गडचिरोली आणि जालना येथे प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली भागात पहिले वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
वैद्यकीय शिक्षण घेण्यास इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यात एमबीबीएसच्या ६०० जागांची अधिकची भर (MBBS seats increased by 600) पडणार आहे. त्यासाठी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Ministry of Health) शिक्षण विभागाकडून मंजूरी (Approved by Education Department) देण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथसह अमरावती, हिंगोली, वाशिम, गडचिरोली आणि जालना येथे प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेच्या वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात तब्बल एमबीबीएसच्या ६०० जागा वाढणार आहेत. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली भागात पहिले वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने दहा जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्याबाबत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे अर्ज केला होता. त्यापैकी दोनच महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली होती. या निर्णयाविरोधात आयोगाकडे अपील करण्यात आले. त्याची सुनावणी काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील आयोगाच्या कार्यालयात झाली. त्यानंतर सोमवारी अंबरनाथ, अमरावती, हिंगोली, वाशिम, गडचिरोली आणि जालना येथे प्रत्येकी एका महाविद्यालयास मंजुरी देण्यात आली.
राज्यात सध्या वैद्यकीय प्रवेशाच्या अजून दोन फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे वाढलेल्या ६०० जागा त्या फेऱ्यांमध्ये दाखविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मागणीनुसार उर्वरित महाविद्यालयांनाही परवानगी मिळण्याची शक्यता वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.
वैद्यकीय आयोगाने यापूर्वीच नाशिक आणि मुंबई येथे प्रत्येकी ५० विद्यार्थी क्षमतेच्या वैद्यकीय महाविद्यालयास परवानगी दिली होती. त्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी रात्री उशिरा परवानगीचे पत्र संबंधित महाविद्यालयांना पाठवले आहेत.