Vidhan Sabha Session : स्वाधार योजना अन् ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर वडेट्टीवारांनी सावेंना धरले धारेवर 

आश्रम शाळांमध्ये शिक्षकांच्या 60 टक्के जागा रिक्त

Vidhan Sabha Session : स्वाधार योजना अन् ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर वडेट्टीवारांनी सावेंना धरले धारेवर 
Vijay Wadettiwar, Atul Save

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

Vidhan Sabha Session Vijay Wadettiwar VS Atul Save : बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये आणि योजनांमध्ये एकसमानता आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारकडून (Government) निश्चित करण्यात आले. यामध्ये अधिछात्रवृत्ती ही योजना राबविण्याकरीता बार्टी, सारथी, महाज्योती आणि अमृत या स्वायत्त संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. यानुसार बार्टी- 200 विद्यार्थी, सारथी- 200 विद्यार्थी, टीआरटीआय- 100 विद्यार्थी, महाज्योती- 200 विद्यार्थी इतक्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती या योजनेचा लाभ मिळणार आहे, या निर्णयावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी (आज ता. 8) राज्य सरकारवर कडाडून हल्ला चढवत इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. 

वडेट्टीवार म्हणाले, ''बार्टी- 200 विद्यार्थी, सारथी- 200 विद्यार्थी, टीआरटीआय- 100 विद्यार्थी, महाज्योती- 200 यामध्ये एकसमानता कशी आणता येईल, कारण ओबीसींची संख्या 52 टक्के आहे. त्यामुळे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना जास्त संधी मिळाली पाहिजे. लोकसंख्येवर आधारीत निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. तो राज्य सरकार उपलब्ध करुन देणार आहे का ?'' असा सवाल त्यांनी केला. 

हेही वाचा : UGC Certificate Courses : UGC कडून प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांना मंजुरी

आश्रम शाळांच्या प्रश्नावरही वडेट्टीवार यांनी राज्य सरकारची कोंडी केली. '' आश्रम शाळांमध्ये शिक्षकांच्या 60 टक्के जागा रिक्त असल्याचे ते म्हणाले. त्या जागा कधी भरणार आहात, अशी विचारणा त्यांनी केला. गणित आणि विज्ञानासाठी तर शिक्षकच नसल्याचे ते म्हणाले,'' त्यावर मंत्री सावे यांनी उत्तर देताना, '' आश्रम शाळेतील रिक्त 282 जागा भरण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्या जागा लवकरात लवकर भरण्यात येतील असे मोघम उत्तर त्यांनी दिले.'' त्यावरून ज्या जागा भरायच्या आहेत, त्या तत्काळ भरण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. त्यावर सावे यांनी शाळांकडून प्रस्ताव आल्यानंतर एक महिन्यात या जागा भरण्यात येईल, असे सभागृहाला सांगितले. 

ओबीसी (OBC) विद्यार्थ्यांसाठी राज्यात 72 वसतिगृह सुरू होणार होती, त्याचे काय झाले ?  ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलेले आहेत. त्या विभागाच्या अनेक बैठका झाल्या आहेत. सत्र संपत आले आहे, तरी वसतिगृह नाहीत. ओबीसींवर अन्याय का करता ? असा खडा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित  केला. त्यावर सावे यांनी सांगितले की, ''राज्यात 52 वसतिगृह जानेवारीमध्ये सुरू होतील. मात्र, शहरी भागात अडचणी आहेत. पुणे (Pune) आणि मुंबईमध्ये प्रस्थाव पाठवला आहे. ते ही लवकरात लवकर सुरू करण्यात येतील,'' असे सावे यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा : वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरु पदाची निवड प्रक्रिया सुरू

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने स्वाधार योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जाते. ही योजना ओबीसी विद्यार्थ्यांना लागू होणार आहे का ? सगळ्यांना या योजनेच्या माध्यमातून मदत मिळते. ओबीसी विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीच्या योजने संदर्भातही वडेट्टीवार आक्रमक झाले होते. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (Scholarship) लवकर मिळाली नाही, असा आरोप त्यांनी केला होता. त्यावर सावे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. आधी आपण 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत होतो. आता आपण 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत आहोत. तसेच शिष्यवृत्तीचेही पैसे सगळ्या विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. त्यावर वडेट्टीवार यांनी 100 विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्या, अशी मागणी केली.