मुंबई विद्यापीठ: नियोजन शून्य कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका, विद्यार्थी वर्षभरापासून निकालाच्या प्रतिक्षेत

विद्यापीठाकडून ठाण्यातील एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. वर्षभरानंतरही या विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठाने अद्याप जाहीर केलेला नाही.

मुंबई विद्यापीठ:  नियोजन शून्य कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका, विद्यार्थी वर्षभरापासून निकालाच्या प्रतिक्षेत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबई विद्यापीठ (Mumbai University) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाच्या नियोजन शून्य कारभाराचा (Mismanagement) फटका विद्यार्थ्यांना बसताना दिसून येत आहे. विद्यापीठाकडून ठाण्यातील एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना चुकीची प्रश्नपत्रिका (Wrong question paper) देण्यात आली होती. वर्षभरानंतरही या विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठाने अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे हे विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. 

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राने म्हणजेच ‘सीडीओई’ने गेली वर्षभरापासून ‘एम.ए. शिक्षणशास्त्र’च्या काही विद्यार्थ्यांचा प्रथम सत्र परीक्षेचा निकाल जाहीर केलेला नाही. निकालापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना गतवर्षी ‘ॲडव्हान्स फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन’ या विषयाची ७५ ऐवजी ६० गुणांची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘सीडीओई’चे तत्कालीन संचालक व अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करूनही आणि कलिना संकुलातील परीक्षा भवनात वारंवार फेऱ्या मारूनही विद्यार्थ्यांच्या हाती काहीच लागले नाही. 

‘सीडीओई’मार्फत २८ मार्च ते ५ एप्रिल २०२३ दरम्यान एम.ए. शिक्षणशास्त्र’ अभ्यासक्रमाची प्रथम सत्र परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा ७५ गुणांची लेखी परीक्षा व २५ गुणांचे अंतर्गत मूल्यमापन अशी होती. परंतु, ठाण्यातील एका महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर २८ मार्च २०२३ रोजी विद्यार्थ्यांना ‘अॅडव्हान्स फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन’ या विषयाची ७५ ऐवजी ६० गुणांची प्रश्नपत्रिका देण्यात आली. ही बाब विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षकांच्या तात्काळ लक्षातही आणून दिली. परंतु विद्यापीठाकडून ६० गुणांचीच प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थांना ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेनुसार परीक्षा द्यावी लागली. या प्रथम सत्र परीक्षेचा निकाल ९ महिन्यांनंतर २ डिसेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आला. मात्र,  निकालपत्रात ठाण्यातील महाविद्यालयात परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे नावच समाविष्ट नसल्याने या विद्यार्थ्यांना अद्याप  निकाल मिळाला नाही.