'उल्लास'मुळे नवसाक्षरांमध्ये उल्हास... राज्यात तब्बल साडेचार लाखांची उपस्थिती

उल्लास ॲपवरील नोंदणीच्या ७४.०३% नवसाक्षरतांची उपस्थिती होती. मराठीसह हिंदी, इंग्रजी, उर्दू,तमिळ, तेलगू, कन्नड, गुजराती आणि बंगाली या नऊ माध्यमातून घेण्यात आली परीक्षा.

'उल्लास'मुळे नवसाक्षरांमध्ये उल्हास... राज्यात तब्बल साडेचार लाखांची उपस्थिती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्र शासन पुरस्कृत 'उल्लास नव भारत साक्षरता' कार्यक्रमांतर्गत (Ulas Nav Bharat Literacy' programme) पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (Basic Literacy and Numeracy Assessment Test) दोन दिवसांपुर्वी महाराष्ट्रातील ३६ हजार परीक्षा केंद्रावर (36 thousand exam center) पार पडली. या उल्लास नव भारत उपक्रमामुळे नवसाक्षरांमध्ये उल्हास पाहायला मिळाला. या परीक्षेत राज्यात तब्बल ४ लाख ५६ हजार ७४८ नवसाक्षरांनी उपस्थिती (Attendance by 4 lakh 56 thousand 748 new literates) नोंदवत उत्साहाने परीक्षा दिली. उल्लास ॲपवरील नोंदणीच्या ७४.०३% उपस्थिती होती. मराठीसह हिंदी, इंग्रजी, उर्दू,तमिळ, तेलगू, कन्नड, गुजराती आणि बंगाली या नऊ माध्यमातून परीक्षा घेण्यात आली.

उत्कृष्ट नियोजन, नवसाक्षरांना राज्यातील क्षेत्रीय अधिकारी आणि शाळांनी उपलब्ध करून दिलेले उत्साहवर्धक वातावरण, शिक्षण संचालनालयासह राज्यातील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, आणि शासन-प्रशासनाच्या आवाहनाला जेष्ठांनी दिलेला प्रतिसाद यामुळे 'उल्लास' अभियानातील महाराष्ट्रात पहिल्यांदाच घेण्यात आलेली उल्लास परीक्षा संस्मरणीय ठरली. आजी - आजोबांनी प्रौढ वयात विद्यार्थीदशेचा अनुभव घेत परीक्षेचा आनंदही लुटला.

परीक्षेच्या पेपर मधील वाचन, लेखन व संख्याज्ञान या तिन्ही भागांमध्ये प्रत्येकी ५०पैकी १७ गुणांच्या उत्तीर्णतेची अट देण्यात आली होती. तर एकूण १५० पैकी ५१ गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक असल्याचे कळविण्यात आले होते. आता केंद्राच्या सुधारित निकषानुसार या तिन्ही भागांमध्ये प्रत्येकी ५० पैकी १६.५ गुण तर एकूण १५१ पैकी ४९.५ गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक असल्याचे योजना शिक्षण संचालक यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना परीक्षा संपताच कळवले आहे. त्यामुळे सुधारित निकषानुसारच उत्तरपत्रिका तपासणी व निकाल जाहीर होणार आहे. या निकषाइतके व त्याहून अधिक गुण प्राप्त झाल्यास अशा नवसाक्षरास साक्षरतेचे उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र देण्यात येईल. तर या निकषानुसार गुण प्राप्त न झाल्यास अशा परीक्षार्थीस अनुत्तीर्ण ऐवजी 'सुधारणा आवश्यक' असा शेरा गुणपत्रकावर देण्यात येणार आहे. नापास असा नकारार्थी शेरा कोणालाही देण्यात येणार नाही. सुधारणा आवश्यक असलेल्या नवसाक्षरांची उजळणी व सराव त्यांचे कुटुंबीय तसेच स्वयंसेवी शिक्षकांनी पुढे चालू ठेवायचा आहे.

_______________________________

उल्लास नव भारत साक्षरता हे अभियान सन २०२७ पर्यंत चालणार आहे, त्यामुळे राज्यातील असाक्षरांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. आत्ताच्या परीक्षेत ज्यांना बसता आले नाही, त्यांना येणाऱ्या सप्टेंबर किंवा मार्चच्या परीक्षेस बसता येईल.
- डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना)

_________________________________

परीक्षेला बसण्यासाठी उल्लास ॲपवरील नोंदणी आवश्यक होती. परीक्षेदिवशी परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालकांनी परीक्षा फॉर्म भरून घेतले. उपस्थितांना परीक्षा क्रमांक देऊन सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत परीक्षा घ्यायची होती. त्यामुळे गैरहजर कोणीही नाही. या परीक्षेत गैरहजर व नापास या संकल्पना नाहीत.
- राजेश क्षीरसागर, शिक्षण उपसंचालक (योजना)

_________________________________

जिल्हानिहाय उपस्थिती पुढीलप्रमाणे -

मुंबई शहर १८०३, मुंबई उपनगर ८६१२, ठाणे १५१५५, पालघर १३२९८, रायगड ७९०२, पुणे ९०४४, अहमदनगर ८३९४, सोलापूर १७५७१, नाशिक २४८३१, धुळे १०२७१, नंदुरबार १६१८३, जळगाव ४१९७५, कोल्हापूर २२५०, सातारा ४२१०, सांगली ७३४३, रत्नागिरी १३३४१, सिंधुदुर्ग २२३, छत्रपती संभाजीनगर १५५९६, परभणी १४२२७, बीड ११९३०, जालना १४२३२, हिंगोली ८७९४, नांदेड१८३९३, धाराशिव ४२२०, लातूर ३५५३, अमरावती २४६५२, अकोला १८८८१, बुलढाणा ५२३३, यवतमाळ १२९२३, वाशिम १४०२५, वर्धा १३६७, नागपूर ७२००, भंडारा ८२६२, गोंदिया ८५०२, चंद्रपूर २८६७६, गडचिरोली ३३८७६, 
 महाराष्ट्र एकूण ४लक्ष ५६ हजार ७४८ नवसाक्षरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.