विद्यापीठातील बौद्ध विहार हटवा, खंडपीठाचे आदेश; मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाकडून मागिवला प्रस्ताव

छत्रपती संभाजीनगर शहर विकासाचा आढावा घेताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील धार्मिक स्थळ नियमित करण्यासाठी प्रस्ताव पाठवा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. 

विद्यापीठातील बौद्ध विहार हटवा, खंडपीठाचे आदेश; मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाकडून मागिवला प्रस्ताव

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) बौद्ध विहार आणि विपश्यना केंद्र हटविण्यासंदर्भात (Removal of religious place) खंडपीठाचे आदेश आहेत. आदेशानुसार स्थानिक प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याला विविध पक्ष, संघटनांनी कडाडून विरोध होत असल्याची बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहर विकासाचा आढावा घेताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील धार्मिक स्थळ नियमित करण्यासाठी प्रस्ताव पाठवा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. 

धार्मिक स्थळ नियमित करण्यासाठी शासनाकडे त्वरित प्रस्ताव पाठवा, असे निर्देश शिंदे मनपा प्रशासक जी. श्रीकांत, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना दिले. श्रीकांत यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी शहराच्या परिस्थितीचा आढावा घेतला. मी आणि पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी धार्मिक स्थळांच्या मुद्यावर होत असलेल्या विरोधाची संपूर्ण माहिती दिली. त्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवा, आम्ही नियमित करण्यासाठी विचार करू, असे सांगितले. 

खंडपीठात दाखल याचिकेवर दोन आठवड्यांपूर्वी सुनावणी झाली. खंडपीठाने धार्मिक स्थळ हटविण्यासंदर्भात निर्देश दिले. त्यासाठी खंडपीठाच्या निर्देशानुसार एक समिती सुद्धा गठित करण्यात आली. या समितीची एक बैठक घेण्यात आली. बैठकीत खंडपीठाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळांना पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्या. या प्रक्रियेला विविध पक्ष, संघटनांकडून कडाडून विरोध सुरू झाला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा विषय ऐरणीवर आल्यावर प्रशासनही चांगलेच संकटात सापडले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देऊन काही प्रमाणात दिलासा दिला आहे.