स्वाधार योजनेच्या आंदोलनाला यश ; ६० कोटींचा निधी वितरित 

स्वाधार योजना विद्यार्थी हक्क समितीच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.परंतु, योजनेतील जाचक नियम काढून टाकाव्यात, या मागणीसाठी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे 

स्वाधार योजनेच्या आंदोलनाला यश ; ६० कोटींचा निधी वितरित 

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क/ पुणे

Swadhar Yojana स्वाधार योजनेच्या लाभाची थकित रक्कम मिळावी ; या मागणीसाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले.मात्र, शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात होते.त्यावर विद्यार्थ्यांनी मुंबई येथे आझाद मैदानावर तळ ठोकून आंदोलन अधिक तीव्र केले.त्यानंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत (Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana )६० कोटी रुपये इतका निधी शासनाकडून शुक्रवारी (दि.१२ ) वितरीत करण्यात आला.त्यामुळे स्वाधार योजना विद्यार्थी हक्क समितीच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.                                                  सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई,ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपुर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६० हजार रुपये तर इतर महसुली विभाग शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५१ हजार रुपये आणि इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४३ हजार रुपये रक्कम सबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यामध्ये जमा केली जाते.परंतु, राज्यातील अनेक विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित होते.

      पुण्यात समाज कल्याण आयुक्त कार्यालयासमोर सुमारे दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते.या आंदोलनास विविध संघटना व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता.विचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता.

        या योजनेअंतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी १२६ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी या योजनेअंतर्गत १५० कोटी इतकी तरतूद करण्यात आली असून त्यामधून यापूर्वी १५ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे.आता ६० कोटी इतका निधी शासनाकडून १२ मे रोजी वितरीत करण्यात आला.शासनाकडून वितरित करण्यात आलेला निधी समाज कल्याण आयुक्तालयाकडून हा निधी अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्‍यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे.त्यामुळे स्वाधार योजना विद्यार्थी हक्क समितीच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.परंतु, योजनेतील जाचक नियम काढून टाकाव्यात, या मागणीसाठी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे