श्री राम मंदिर मूर्ती स्थापना समारंभाच्या विरोधात विद्यार्थी आंदोलनाच्या तयारीत : शिक्षण संस्थांकडून कारवाईचा इशारा 

श्री राम मंदिर मूर्ती स्थापना समारंभाच्या विरोधात विद्यार्थी आंदोलनाच्या तयारीत : शिक्षण संस्थांकडून कारवाईचा इशारा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशात सगळीकडे २२ जानेवारी रोजी अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या मूर्ती स्थापनेच्या समारंभाच्या पार्शवभूमीवर उत्साहाचे वातावरण असताना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) आणि IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांचा एक गट या कार्यक्रमाच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. दरम्यान शिक्षण संस्थांकडून राम मंदिराच्या मूर्ती स्थापनेच्या समारंभाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधात करावाईचा इशारा दिला आहे.

 TISS ने 18 जानेवारी रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, "काही विद्यार्थी 22 जानेवारी रोजी संस्थेच्या जुन्या किंवा नवीन कॅम्पसमध्ये रामजन्मभूमी 'प्राण प्रतिष्ठान' विरोधात आंदोलन आयोजित करण्याचा विचार करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. आम्ही विद्यार्थ्यांना असे कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ नये अशी सक्त ताकीद देतो, असे न केल्यास पोलीस प्रशासन अशा घटनांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांवर आवश्यक कारवाई करेल." 

दुसरीकडे, आयआयटी मुंबईने या प्रसंगी 'गौशाळे'चे उद्घाटन आणि प्रसिद्ध कवी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या 'गीत रामायण' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मात्र, आंबेडकर फुले स्टडी सर्कल ( APPSC) या आयआयटी मुंबईच्या डाव्या विद्यार्थी संघटनेने यावर टीका केली आहे.

APPSC IIT- मुंबई ने ट्विट केले आहे की, "IIT मुंबई प्रशासनाकडून होत असलेल्या घटनांवरून असे दिसून येते की त्यांनी भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेचे तत्व सोडले आहे आणि हिंदुत्ववादी राजकीय शक्तींना बळी पडण्यास सुरुवात केली आहे.