शरद पवार यांनी घेतला सीबीएसई बोर्डाचा समाचार

फाळणीचा इतिहास रक्तपाताचा असून त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कटुतेची भावना निर्माण होण्याची अधिक शक्यता आहे. सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने हे योग्य नाही.

शरद पवार यांनी घेतला सीबीएसई बोर्डाचा समाचार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशाच्या इतिहासाबरोबरच विद्यार्थ्यांना (Students) फाळणीनंतरच्या समाजाच्या स्थितीची माहिती द्यावी,असे परिपत्रक केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) प्रसिद्ध केले आहे. परंतु, फाळणीचा इतिहास रक्तपाताचा असून त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कटुतेची भावना निर्माण होण्याची अधिक शक्यता आहे. सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने हे योग्य नाही. त्यामुळे राज्य शासनाने सीबीएसईला या बाबतीत आवाहन करावे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले आहे.

 धनकवडी परिसरातील सरहद पब्लिक स्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि गोपाळ कृष्ण गोखले प्रबोधिनीच्या शुभारंभाच्या समारंभ प्रसंगी पवार बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, सरहदचे अध्यक्ष संजय नहार, संतसिंह मोखा, विश्वस्त शैलेश पगारिया आदी उपस्थित होते.

Talathi Bharti : पेपरफुटीनंतर आता सर्व्हर डाऊन, यात काही काळंबेरं आहे?

पवार म्हणाले, देशासमोर असलेल्या प्रश्नांबद्दल तरुणाईच्या मनात आस्था, संवेदना निर्माण करायची असेल तर अभ्यासक्रमातून हिंसा आणि कटुतेऐवजी वेदना आणि दुःख पोहोचवले पाहिजे. देशासमोर असणारे प्रश्न सोडवण्यासाठी येणारी नवी पिढी वैचारिकदृष्ट्या सशक्त असली पाहिजे. ती होण्यासाठी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण काय बिंबवतो आहोत, हेही पाहायला हवे. सीबीएसईच्या परिपत्रकामुळे वेदनेऐवजी रक्तपात, हिंसा आणि कटुता रुजण्याची शक्यता अधिक आहे.

काश्मीरमधील परिस्थितीची सर्वाधिक किंमत तिथल्या तरूण पिढीला मोजावी लागली आहे. अशा कटुतेतून युवकांना बाहेर काढत देश तुमच्या पाठीशी आहे, अशी भावना निर्माण करणे गरजेचे आहे,असे नमूद करून पवार म्हणाले,सरहद संस्थेने देशातील विविध राज्यातील तरुणांमध्ये एकवाक्यता आणण्याचे काम केले. 

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ज्यांना शिक्षणाची गरज आहे, अशा देशातल्या कमकुवत प्रांतातल्या मुलांना पुण्यात आणून शिक्षणाच्या माध्यमातून उभारी देण्याचा मार्ग कुणाला सुचला नव्हता. सरहद संस्थेनं हे काम केल्यामुळं शिक्षणाच्या माध्यमातून अनेक दुःखितांचे अश्रू पुसण्याचं महत्त्वाचं काम होत आहे.

चद्रकांत पाटील म्हणाले, ‘जगाच्या पाठीवर उदयास आलेल्या अनेक संस्कृती, परंपरा लोप पावल्या. पण भारतीय परंपरा आणि संस्कृती अजून टिकून आहे. त्यात असलेली देण्याची भावना हे त्यामागचे एकमेव कारण आहे. समस्या सोडविण्यासाठी काम करणाऱ्या लोकांना पक्षभेद विसरून येथे मदत करण्याची भावना जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशाला कुणीही संपवू शकत नाही.’

गोपाळ कृष्ण गोखले प्रबोधिनीच्या स्थापने मागची भूमिका श्रीराम पवार यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘विसाव्या शतकाच्या सुरवातीला पुण्याने देशाचे नेतृत्व केले .स्वातंत्र्यानंतर देश कुठल्या दिशेने जायला पाहिजे याचा विचार गोखलेंनी मांडला. त्यांनी जी सूत्रे सांगितली ती देशाच्या घटनेत आली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo