SPPU News : प्र-कुलगुरू नियुक्ती हा राजकीय निर्णय की शैक्षणिक? चर्चेला तोंड फुटले

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत प्र-कुलगुरूंची निवड केली जाईल, अशी दाट शक्यता होती.

SPPU News : प्र-कुलगुरू नियुक्ती हा राजकीय निर्णय की शैक्षणिक? चर्चेला तोंड फुटले
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (SPPU) कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी (Dr. Suresh Gosavi) यांच्या नियुक्तीला आज (दि. ६ ऑगस्ट) दोन महिने पुर्ण झाले. पण अजूनही विद्यापीठाला प्र-कुलगुरू मिळालेले नसल्याने अनेक चर्चांना तोंड फुटले असून प्रश्नही उपस्थित केले जात आहे. विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य धनंजय कुलकर्णी (Dhananjay Kulkarni) यांनी प्र-कुलगुरुंची निवड कधी आणि कोणत्या निकषांवर होणार, याबाबत गंभीर मुद्दे मांडले आहेत. प्र-कुलगुरू नियुक्ती हा राजकीय निर्णय की शैक्षणिक निर्णय, असा सवाल त्यांनी केला आहे. (Delay in appointment to the post of Pro Vice-Chancellor of Savitribai Phule Pune University)

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत प्र-कुलगुरूंची निवड केली जाईल, अशी दाट शक्यता होती. पण इच्छुकांचा आकडा मोठा असल्याने निर्णय झाला नाही, असे सांगण्यात आले. ही निवड कुलगुरूंच्या हाती असते. त्यासाठी ते काही निकष लावून निवड करतात. पण दोन महिने उलटल्यानंतरही विद्यापीठाला प्र-कुलगुरू न मिळाल्याने धनंजय कुलकर्णी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

प्राध्यापक भरती गैरव्यवहार : एक महिन्यांपासून विद्यापीठ करतय काय ! चौकशी केव्हा होणार ?

‘एज्युवार्ता’शी बोलताना कुलकर्णी म्हणाले, मुंबई विद्यापीठात प्र-कुलगुरू नियुक्ती कुलगुरू नियुक्ती नंतर त्वरित करण्यात आली. मग पुणे विद्यापीठात काही विलंब लागत आहे. प्र-कुलगुरूंची निवड तातडीने होणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे शैक्षणिक विभागाची संपूर्ण जबाबदारी असते. त्यामुळे अनेक कामांवर परिणाम होत आहे. ही निवड कशी होते, हे उघड सत्य आहे. यामध्ये राजकीय हस्तक्षेप होतो. पण त्यासाठीही इतका कालावधी लागत असेल तर हे योग्य नाही. कुणाचीही निवड करा, पण लवकर करा, अशी नाराजी कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

काय म्हणतात धनंजय कुलकर्णी?

विद्यापीठ कायदा काय सांगतो? प्र - कुलगुरू या पदासाठी पात्र उमेदवार कोणत्या राजकीय विचाराचे अथवा कोणत्या शिक्षण संस्थेशी संबधीत, या निकषावर आधारीत निर्णय होणार? कुलगुरू उपलब्ध उमेदवारी अर्जावर  गुणवत्ता निकषावर प्र-कुलगुरू पदाचा निर्णय करणार का? प्राचार्य संघटना, प्राध्यापक संघटना यांच्या दबावाखाली निर्णय होणार का? की अन्य काही निकषांवर?, असे सवाल कुलकर्णी यांनी केले आहेत.

विद्यमान कुलगुरू विविध गट, तट, पक्ष, संघटना, विचार प्रवाह, राज्य-केंद्र स्तरावरील मंत्री महोदय यांच्या दबावाखाली निर्णय होणार का? अशा प्रश्नांची चर्चा चालू आहेत. निर्णय लांबला आहे?  केव्हा होणार हे कोणीच सांगू शकत नाही. व्यवस्थापन परिषद सदस्य आपापसातील हेवेदावे विसरून प्र-कुलगुरू पदाचा निर्णय करण्यास कुलगुरूंना सहकार्य करणार का?  कुलगुरू स्वतः च्या अधिकाराचा कायद्यानुसार वापर करण्यास, संबधित घटक त्यांना स्वातंत्र्य देणार का? की प्र-कुलगुरू पद भरण्यास राजकीय विलंब होत राहणार?, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD