वाचन सर्वाधिक परतावा देणारी उत्तम गुंतवणूक : विनोद शिरसाट

भोवतालाचे आकलन, भान, कुतूहल, समजूत प्रगल्भ करण्याच्या प्रक्रियेत वाचनाचा मोठा वाटा आहे.

वाचन सर्वाधिक परतावा देणारी उत्तम गुंतवणूक : विनोद शिरसाट

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे : "समाजात चांगल्या पद्धतीने सकारात्मक हस्तक्षेप करण्यासाठी जे भान आवश्यक असते, ते वाचनातून जागृत होते. वाचन भौतिक समृद्धीसह आत्मिक समाधानही देते. मात्र, त्यासाठी वाचनाची कौशल्ये अवगत करणे आवश्यक आहे. वाचन ही सर्वाधिक परतावा देणारी उत्तम गुंतवणूक आहे,(Reading Best Investment With Highest Returns)" असे प्रतिपादन साधनाचे संपादक व प्रसिध्द लेखक विनोद शिरसाट (Vinod Shirsat, editor of Sadhana and famous writer) यांनी येथे केले. 

विद्यार्थी साहाय्यक समिती आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या युवा साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी शिरसाट बोलत होते. 'वाचन - का व कसे' असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, विद्यार्थी विकास केंद्राच्या अध्यक्ष सुप्रिया केळवकर, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी तसेच प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते.

विनोद शिरसाट म्हणाले, 'आनंद मिळवणे, हा वाचनाचा प्राथमिक परतावा असतो. तिथेच न थांबता, अधिक परिपक्व, समंजस, दृष्टीकोन घडवणारे वाचन आपण केले पाहिजे. वाचन ही या अर्थाने एकट्याने एकांतात कऱण्याची वैचारिक कृती आहे. लिखित शब्द मानवाच्या आयुष्यात तुलनेने विलंबाने आला असला, तरी श्रवण आणि वाचेचे संस्कार पुरातन काळापासून आहेत. भोवतालाचे आकलन, भान, कुतूहल, समजूत प्रगल्भ करण्याच्या प्रक्रियेत वाचनाचा मोठा वाटा आहे.

आकलन श्रीमंत करण्याची प्रक्रिया अनुभव आणि अभ्यास, यातून घडते. त्यातून दृष्टीकोन विकसित होत जातो. दृष्टीकोन एखाद्या साफ्टवेअरप्रमाणे प्रतिसाद देतो. हा प्रतिसाद अधिक सकारात्मक, उन्नत कऱण्यासाठी वाचनाची सवय करून घेतली पाहिजे. कविता, विनोद, कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, वैचारिक, समीक्षापर अशा क्रमाने वाचनाचा परिप्रेक्ष् विस्तारत जातो आणि आपले सभोवतालाचे भान अधिक संवेदनशील व जागृत होत जाते', असेही शिरसाट म्हणाले. 

मिलिंद जोशी म्हणाले, 'सुरवातीला मिळेल ते जरूर वाचा पण नंतर वाचन सखोल, निव्वळ माहितीपेक्षा ज्ञान देणारे असेल, याकडे लक्ष द्या. प्रगल्भ वाचनाचे संस्कार स्वीकारून वैचारिक वारसदार व्हा,

सुप्रिया केळवकर यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. समीक्षा नाणेकर यांनी परिचय करून दिला. ओंकार शिंदे यांनी आभार तर  स्वामिनी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.